नांदेड (वृत्तसंस्था) येथील अंमली पदार्थ कारखान्याचा पर्दाफाश करुन तीन आरोपींना अटक केली होती. या तिन्ही आरोपींना नांदेडच्या न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई एनसीबीचे समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुधाकर शिंदे यांच्या पथकाने काल पर्दाफाश केला होता.
दरम्यान, या प्रकरणात आणखी एका आरोपीला एनसीबीच्या पथकाने अटक केली आहे. त्यामुळे आता आरोपींची संख्या चार झाली आहे. एनसीबीचे पथक आणखी नांदेडमध्येच असून, एनसीबीची आठ दिवसातील ही दुसरी मोठी कारवाई असल्याने वानखेडे यांची टीम अॅक्शन मोड मध्ये दिसत आहे. या कारखान्यातून तब्बल १११ किलो अंमली पदार्थ, मशिनरी असे एकूण एक कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, आता याप्रकरणी आणखी काही ठिकाणी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नांदेडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ येतात तरी कुठून याचा शोध एनसीबीचे पथक घेत आहेत.















