नाशिक (वृत्तसंस्था) दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत विजयी सदस्यांच्या हरकतीच्या बाजूने निकाल देण्यासाठी तब्बल ३० लाख रुपयांची लाच घेताना जिल्हा उपनिबंधक सतीश भाऊराव खरे यास अटक करण्यात आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. खरेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक युनिटने त्यांच्या राहत्या घरातून रंगेहात पकडले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक युनिटच्या पथकाने जिल्हा उपनिबंधक सतीश खरे (४०, रा. आई हाईट्स, कॉलेज रोड) यांच्यासह ॲड. शैलेश सुमातीलाल सभद्रा (३२, रा. रा. उर्वी अपार्टमेंट सौभाग्य नगर, गंगापूर रोड) यांना ३० लाख रुपयांची मागणी करून सतीश खरे यांना त्यांच्या कॉलेज रोड येथील निवासस्थानी लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले आहे.
दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत निवडीविरुद्ध प्रतिस्पर्धी उमेदवाराने हरकत घेतली होती. त्यावर खरे याच्याकडे सुनावणी सुरू होती. तक्रारदारांच्या बाजूने निकाल देण्यासाठी खरे याने अॅड. शैलेश साबद्रा यांच्यामार्फत ३० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, लाचेत साबद्रा यांना टक्केवारी द्यावी लागणार असल्याने खरे याने थेट तक्रारदाराकडेच लाचेची मागणी केली आणि त्यांना आपल्या घरी बोलावून घेतले. यानंतर ३० लाखांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना पथकाने खरे यास रंगेहाथ अटक केली. दरम्यान, एसीबीच्या पथकाला खरेच्या घरातून १७ लाखांची रोकड, ४५ तोळे सोने तसेच १७ लाख रुपयांची रोकड तसेच ४५ तोेळे सोने जप्त केल्याचे कळते.