नाशिक (वृत्तसंस्था) नाशिक-पुणे महामार्गावर नेहरूनगरजवळील सेंट झेविअर्स हायस्कूलजवळ भरधाव ट्रकने दुचाकीवरून जाणारी अठरा वर्षीय तरुणीला चिरडल्याने तरुणी जागीच ठार झाली. अनुष्का रवींद्र दिवटे असे तरुणीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ऐन दसऱ्याच्या दिवशीच या तरुणीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
अनुष्का दिवटे (रा. पद्मावती सोसायटी, बिटको महाविद्यालयामागे, नाशिकरोड) ही बारावी उत्तीर्ण आहे. तरुणी दुपारीचारच्या सुमारास नाशिकहून दुचाकीवर (एमएच १५, डीझेड ७९५६) नाशिकरोड येथे घरी जात होती. सेंट झेविअर्स शाळेजवळ मागून आलेल्या भरधाव ट्रकने (एमएच २४, एफ ९७८६) तिच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्याच ट्रकखाली चिरडून अनुष्काचा मृत्यू झाला. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत देखील झाली होती. घटनास्थळापासून जवळच असलेल्या उपनगर पोलिस ठाण्यातील पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ट्रक ताब्यात घेतला. या अपघात प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. येथे शाळा असूनही तशी सूचना देणारा फलक लावण्यात आलेला नाही. जय भवानीरोडकडे वळताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंला गतिरोधक देखील नाही आहेत. मात्र, गतिरोधक असल्याचाही फलक नाही. गतिरोधकांवर पांढरे पट्टेदेखील नाहीत. या रस्त्यावर रात्रंदिवस वाहतूक सुरूच असते. त्यामुळे येथे पूर्णवेळ पोलिस नेमणे गरजेचे आहे, असे मत वाहनचालकांकडून व्यक्त होते आहे.