मुंबई (वृत्तसंस्था) नाथाभाऊ आमचे मोठे नेते होते, त्यांच्या पक्षातरांमुळे पक्षाचे तात्पुरते क्षणिक नुकसान नक्कीच होईल. पण, कोणीही मोठा नेता त्यांच्याबरोबर जाणार नाही, असं भाजप नेते गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी छळ केल्यामुळे पक्ष सोडल्याचा खडसेंनी केलेला कांगावा अत्यंत चुकीचा असून पक्ष सोडण्याची पाळी का आली याचे आत्मचिंतन त्यांनी केले तर नवीन पक्षात ते सुखी राहतील, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे व इतरही आरोप झाले. माझ्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कधीही आरोप केले नाहीत असे खडसे आज सांगतात; पण त्यावेळच्या विरोधी पक्षाने त्यांच्या राजीनाम्यासाठी राजभवनावर जाऊन राज्यपालांना निवेदन दिले होते, सभागृहातदेखील आरोप केले होते, याकडे महाजन यांनी लक्ष वेधले. खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यावेळच्या परिस्थितीसाठी फडणवीस कसे जबाबदार असतील. भाजपच्या कोणत्याही नेत्याबाबत होणारा निर्णय हा सामूहिक असतो. मात्र, फडणवीस यांना टार्गेट करणे खडसेंना सोपे वाटत असावे, असा टोलाही महाजन यांनी हाणला.
खडसे राष्ट्रवादीत गेल्याने जळगाव जिल्ह्यात भाजपचे मोठे नुकसान होईल का, या प्रश्नात महाजन म्हणाले की, काहीही फरक पडणार नाही. लहानमोठ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला ते दिसेलच. भाजप व्यक्तिकेंद्रित पक्ष नाही. कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जिल्ह्यातील जनता भाजपसोबत कालही होती, उद्याही राहील. मी आज काही बोलणार नाही पण भाजपत असताना पक्षाविरुद्ध कुठे कुठे कोणी काय काय केले ते योग्यवेळी सांगेन.