धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यासह धरणगावातील दिव्यांग बांधवांच्या अनेक समस्यांचा विचार करून राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघाने प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात निवेदन धरणगाव तहसीलचे नायब तहसीलदार संदीप मोरे आणि पंचायत समितीचे कक्ष अधिकारी शिवाजीराव बेडसे यांना दिले.
निवेदन प्रसंगी राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा धरणगाव तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी दिव्यांगांच्या समस्यांविषयी भाष्य करत सांगितले की, दिव्यांगांना अंत्योदय पत्रिका, ५ टक्के निधी, दिव्यांग भवन, दिव्यांगांच्या घरकुलाचा प्रश्न, दिव्यांगांच्या व्यावसायिक जागा, नगरपालिकेकडून मिळणारे अनुदान, या सर्व समस्यांचा सामना अनेक वर्षांपासून होत आहे. यासाठी महासंघाने वेळोवेळी पाठपुरावा केला, अर्ज केले, परंतु प्रशासनाने अद्याप कुठल्याही प्रश्नाचे निराकरण केलेले नाही.
संजय पाटील यांनी अधिक स्पष्ट करत सांगितले की, “जगभरात दिव्यांगांची लोकसंख्या सात ते आठ टक्के आहे आणि महाराष्ट्रात ७० लाखांहून अधिक दिव्यांग लोक आहेत. यासाठी, शासन आणि प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता त्यांच्या समस्यांचे त्वरित समाधान करावे.”
यावेळी, मॅगझिन व इतर दिव्यांगांचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि सर्वांनी एकजूट होऊन दिव्यांगांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्याची आवश्यकता व्यक्त केली.
निवेदनात समाविष्ट मागण्या:
१. दिव्यांगांना ३५ किलो अन्नधान्य देणारे अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात यावा.
२. धरणगाव तालुक्यातील दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा.
३. दिव्यांगांसाठी ५ टक्के निधीच्या वाटपाची प्रक्रिया सुरू केली जावी.
४. दिव्यांगांना मानसी वेतन रु. ५०००/- मिळावे.
५. दिव्यांगांसाठी शासकीय बँकेत राखीव कोटा राखीव ठेवावा.
६. दिव्यांगांचा सर्वे नगरपालिका व ग्रामपंचायतीत करण्यात यावा.
७. दिव्यांगांसाठी व्यापारी संकुलात गाळा मिळावा.
८. दिव्यांगांसाठी स्वतंत्र कार्यालय प्रदान करावे.
९. दिव्यांगांना कर्जमाफी मिळावी.
१०. दिव्यांगांच्या घरकुलांसाठी अनुदान देण्यात यावे.
११. दिव्यांगांना ५० टक्के घरपट्टी व पाणीपट्टी सवलत मिळावी.
१२. दिव्यांगांना कर्ज माफी मिळावी.
१३. दिव्यांग सर्टिफिकेट कॅम्प धरणगाव शहरात आयोजित करावा.
१४. अतिक्रमण जागेत व्यवसाय करणाऱ्या दिव्यांगांना पर्यायी जागा मिळावी.
या मागण्यांसाठी महासंघाने ठरवले आहे की, जर प्रशासनाने लवकरच या समस्यांचे समाधान न केले, तर दिव्यांग संघटनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हक्क-अधिकाराच्या मार्गाने आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
निवेदन सादर करत असताना रमेश चौधरी, देवा महाजन, राजू चौधरी, प्रमोद सुतारे, रविंद्र काबरा, सागर पाटील, लिलाधर नन्नवरे आणि अन्य असंख्य दिव्यांग संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.