अमरावती (वृत्तसंस्था) राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरूंगात असलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचे आक्षेपार्ह फोटो फेसबुक व अन्य सोशल मीडियातून व्हायरल केल्याचे समोर आलं आहे. याप्रकरणी अमरावतीतील राजापेठ पोलीस ठाण्यात सहा जणांविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
खासदार नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी यासंदर्भातील तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी चंद्रपूर येथील निखिल काटोले, प्रवीण पराड, शेखर तायडे, निलेश माटेकर यांच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. या ६ जणांनी सोशल मीडियावर खासदार राणा यांचे आक्षेपार्ह छायाचित्र सोशल मीडियावर प्रसारीत केले होते. त्यामुळे अनेकांनी आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिल्या होत्या.
या प्रकारामुळे खासदार राणा यांची प्रतिमा मलिन करण्यासोबतच चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या ६ जणांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी तक्रार नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी राजापेठ पोलिसात दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत करुन बदनामी केल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.