मुंबई (वृत्तसंस्था) देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन महाराष्ट्रात ड्रग्जचा खेळ सुरु आहे, असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला आणखी एक नवं वळण लागलं आहे. यावेळी नवाब मलिकांनी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. फडणवीस यांच्या आशीर्वादानं ड्रग्जचा काळा धंदा सुरु आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची न्यायिक आणि सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
जयदीप राणाचा फोटो आज नवाब मलिक यांनी ट्वीट केला. जयदीप राणाचा हा फोटो देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबतचा होता. अमृता फडणवीस यांनी एक रिव्हर अँथम गायलेलं होतं. नदी संरक्षणासाठीचं हे गाणं होतं. या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीसही आणि सुधीर मुनगंटीवार झळकलेले होते. याच गाण्याचा फायनांसर हा जयदीप राणा होता, अशी माहिती नवाब मलिकांनी बोलताना दिली. तसेच देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन सगळा ड्रग्सचा खेळ सुरु आहे, असा खळबळजनक आरोपही नवाब मलिकांनी केला आहे.