भुसावळ (प्रतिनिधी) रावेर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीने उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. बुधवार, 10 रोजी पक्षाने यादी प्रसिद्ध केली असून त्यात श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याचे म्हटले आहे.
श्रीराम दयाराम पाटील हे 53 वर्षीय उद्योजक असून समाजातील विविध क्षेत्रात देखील त्यांनी काम केले आहे. रावेर तालुक्यातील रणगांव येथे त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांनी स्वतः रावेर येथे श्रीराम ऑटो सेंटर, श्रीराम मॅक्रोव्हिजन अकादमी, श्रीराम फाउंडेशन, श्रीराम अॅग्रो प्लास्ट इंडस्ट्रीज उभारली आहे. याशिवाय श्री साईराम प्लास्टिक आणि इरिगेशन हे रावेर, नशिराबाद, जळगाव अशा ठिकाणी त्याच्या शाखा आहेत. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यात त्यांच्या व्यापाराचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. गत अनेक वर्षांपासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपाने येथून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना तिसर्यांदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपाशी दोन हात करता येईल व तुल्यबळ लढत होण्याच्या दृष्टीने शरदचंद्र पवार यांनी पॉवर गेम खेळत मराठा समाजाचा आश्वासक चेहरा म्हणून श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्याचे स्पष्ट आहे. पक्षाने बुधवारी जाहीर केलेल्या यादीत श्रीराम पाटील हेच आता रावेर लोकसभेचे उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले आहे.