पिंपरी चिंचवड (वृत्तसंस्था) पिंपरी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावरील गोळीबार प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे, पीए यांच्यासह ८ ते ९ जणांवर अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे कंत्राटदार सिजू अँथनी यांच्या कार्यालयात सिद्धार्थ बनसोडे ११ मे रोजी दुपारी घुसले होते. त्यानंतर दोघा कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. लोखंडी टॉमीसारख्या घातक शस्त्राने दोघांवर हल्ला केल्याचं सीसीटीव्हीत देखील कैद झालं आहे. अँथनी यांच्या कंपनीचे मॅनेजर तानाजी पवार कुठे आहेत, हे कर्मचाऱ्यांनी न सांगितल्याच्या रागातून आमदारपुत्र आणि पीएसह दहा जणांनी हा जीवघेणा हल्ला केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.
अण्णा बनसोडे गोळीबारातून वाचले
पिंपरी चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांचं कार्यालय आहे. याच परिसरात बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास तानाजी पवार याने अण्णा बनसोडे याच्यावर गोळीबार केला होता. तानाजी पवारने पिस्तुलीतून अण्णा बनसोडे यांच्यावर ३ राऊंड फायर केले होते. या गोळीबारातून अण्णा बनसोडे हे थोडक्यात बचावले. पोलिसांनी तानाजी पवारला ताब्यात घेतले.