पंढरपूर । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आज पंढरपुर दौऱ्यावर आहेत. सहकारातील ज्येष्ठ नेते माजी आमदार सुधाकर परिचारक, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील आणि प्रसिद्ध किर्तनकार रामदास महाराज जाधव (कैकाडी) यांच्या कोरोना निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांची पवार सांत्वनपर भेट घेणार आहेत. माजी आमदार सुधाकर परिचारक यांचे राष्ट्रवादी आणि पवार घराण्याचे अनेक वर्षांचे ऋणानुबंध होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेवेळी सुधाकर परिचारकांनी पवारांना जिल्ह्यातून मोठी ताकद निर्माण करून दिली होती.
पवारांनीही परिचारकांवर एसटी महामंडळाच्या रूपाने मोठी जबाबदारी दिली होती. साखर कारखान्यांच्या माध्यमातून पवार यांनी परिचारकांना नेहमीच मदत केली. सुधाकर परिचारक आणि शरद पवार यांचे 2019 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत सलोख्याचे आणि मैत्रीचे संबंध होते. सन 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत परिचारकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवली होती. तरीही शरद पवारांनी परिचारकांच्या विरोधात थेट टिका-टिप्पणी करण्याचे आवर्जून टाळले होते.
सुधाकर परिचारकांच्या निधनापूर्वी काही दिवस शरद पवारांचे घनिष्ठ (कै) यशवंतभाऊ पाटील यांचे पुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचे कोरोनामुळे निधन झाले. राजू बापू पाटील हे शेवटपर्यंत राष्ट्रवादीशी आणि पवारांच्या विचारांशी प्रमाणिक राहिले होते. अलीकडेच संत कैकाडी महाराजांचे पुतणे प्रसिद्ध किर्तनकार रामदास महाराज जाधव (कैकाडी) यांचेही कोरोनामुळे निधन झाले. रामदास महाराज आणि शरद पवार यांचे गेल्या अनेक वर्षांपासून अगदी जवळचे संबंध होते. रामदास महाराजांच्या अनेक धार्मिक कार्यक्रमांना शरद पवारांनी हजेरी लावली होती.