नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एनडीटीव्हीचे ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्या धक्क्यानं आज लखनौमध्ये त्यांचं निधन झालं असल्याची माहिती आहे.
सध्या कमल खान NDTV वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक म्हणून काम करत होते. त्यांना रामनाथ गोएंका पुरस्कारानं ही सन्मानित करण्यात आलं होतं. तसंच भारताच्या राष्ट्रपतींकडून कमल खान यांना गणेश शंकर विद्यार्थी पुरस्कारही मिळाला आहे. लखनऊच्या बटलर पॅलेस कॉलनीत राहणारे खान दीर्घकाळ टीव्ही पत्रकारितेत काम करत होते. बातमी सादर करण्याच्या त्यांच्या शैलीचे देशभरात कौतुक व्हायचं.
मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केला शोक
कमल खान यांच्या निधनावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. सीएम योगी म्हणाले की, मी शोकाकुल कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. हे पत्रकारितेचे कधीही न भरून येणारे नुकसान आहे. कमल हे निःपक्षपाती पत्रकारितेचे चौथे स्तंभ आणि भक्कम पहारेकरी होते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.