मुंबई (वृत्तसंस्था) ‘देशाची अर्थव्यवस्था कोसळली आहे. मंदीच्या लाटेनं सगळेच गटांगळ्या खातील अशी स्थिती आहे. राज्यकर्ते आत्मसंतुष्ट व आत्मपौढीक मग्न असले की असे होणारचं’, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. तसंच, ‘अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी एका नव्या मनमोहन सिंगांची गरज आहेच. किमान पंतप्रधान मोदी यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या भूमिकेतून प्रे. रुझवेल्ट यांच्या भूमिकेत शिरणे महत्त्वाचं आहे,’ असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी दैनिक सामनातील रोखठोक या सदरातून मोदींवर हल्ला चढवला आहे. कोरोना महामारीने देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. आज देशातील ६० टक्के कामगार बेकार झाले आहेत. राष्ट्रीय उत्पन्न दोन तृतीयांशने खाली आले आहे, पण आपले राज्यकर्ते मात्र उदासीन आणि आत्मसंतुष्ट आहेत, असं सांगतानाच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत. अशा संकटसमयी एखादा नवा मनमोहन सिंग निर्माण करून त्याच्या हाती देशाची अर्थव्यवस्था सोपवणे गरजेचे आहे, असं मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
कोणी काही म्हणा, पश्चिम बंगालच्या निवडणुका संपल्याने निदान पंतप्रधान मोदी यांनी आता रवींद्रनाथ टागोरांच्या भूमिकेतून बाहेर पडून प्रे. रुझवेल्टच्या भूमिकेत शिरावे! देशाला त्याचीच गरज आहे. देशाला आता विश्वास आणि सकारात्मक ऊर्जेची गरज आहे. ती लवकरात लवकर मिळो!, असंही ते म्हणाले.
‘कोरोना संकटामुळं शेअर बाजाराची रोजच पडझड सुरु झाली आहे. आपल्या देशात नाही, तर जगभरात एक मंदीची लाट आली आहे. भारतासारख्या देशात उत्पादनाचा वेग घटला आहे. लोकांनी नोटाबंदीच्या काळात नोकऱ्या गमावल्याच होत्या. आता लॉकडाऊनमध्ये उरलेल्या लोकांनीही नोकऱ्या गमावल्या, असं सांगतानाच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत. अशा संकटसमयी एखादा नवा मनमोहन सिंग निर्माण करून त्याच्या हाती देशाची अर्थव्यवस्था सोपवणे गरजेचे आहे,’ असा टोला त्यांनी लगावला आहे.
‘पंतप्रधान मोदी हे एक राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक चांगले अर्थतज्ञ त्यांना सोडून गेले आहेत. गुजरात हा व्यापाऱ्यांचा प्रदेश आहे. ‘हम बनिया लोग है’ असे ते लोक अभिमानाने सांगतात. मोदी यांनीही ‘आपण व्यापारी आहोत’ असे वारंवार सांगितले, पण व्यापारीच दुकान थंडा करून बसले आहेत,’ असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
‘मंदीतून सावरण्यासाठी अर्थव्यवस्थेस उभारणी देण्यासाठी आपण नक्की काय करीत आहोत यावर देशाचे पंतप्रधान व अर्थमंत्री काहीच बोलायला तयार नाहीत. प. बंगालमधील निवडणुकीत ममता बॅनर्जी नक्कीच हरतील, असे मोदी सांगतात. हे काही कोसळणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील ‘रेमडेसिवीर’ उपचार नव्हेत. महाराष्ट्राचे सरकार आपल्याच ओझ्याने कोसळेल, असे अमित शहा म्हणतात. हासुद्धा मंदी व बेरोजगारीच्या प्रश्नावरचा उतारा नाही. देशाच्या अर्थमंत्री तर कुठेच दिसत नाहीत,’ असंही ते म्हणाले आहेत.
‘अमेरिकेत प्रे. रुझवेल्ट यांच्या भाषणानंतर पहिल्या तीन महिन्यांत सर्वच राष्ट्रीय बँकांनी, आर्थिक संस्थांनी जोरात उलाढाल सुरू केली. नवे सकारात्मक वातावरण निर्माण झाले. लोकांना खात्री पटली की, प्रे. रुझवेल्ट यांचे सरकार हे केवळ गतिमान व पुरोगामीच नाही, तर आनंदी व आनंदवर्धक आहे. ‘जगा आणि जगू द्या’ पद्धतीचे आहे. दुःख विसरून कामास लागा, आनंदाची नवी क्षितिजे शोधा असे सांगणारे आहे. लोकांनी त्याचे प्रचंड स्वागत केले आणि आर्थिक मंदीचे रूपांतर अर्थव्यवस्था गतिमान होण्यात झाले. हे मी का सांगतोय? आपल्याला आजचे संकट दूर करण्यासाठी एक मनमोहन सिंग आणि एक रुझवेल्ट हवा,’ असंही राऊत म्हणाले आहेत.