मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर नवीन खळबळजनक आरोप केला आहे. भाजपच्या दबावामुळे नाईक यांनी आत्महत्या केली. या किरीट सोमय्यांनी अन्वय नाईक यांना दोन वेळा धमकी दिली, असा नवा गंभीर आरोप करून राऊत यांनी खळबळ उडवून दिली. सोमय्या पिता-पुत्र दोघेही लवकरच जेलमध्ये जाणार असा दावा पुन्हा राऊत यांनी केला.
दोन दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात बॉम्ब टाकल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी सकाळीच सोमय्यांच्या विरोधात रॉकेट सोडलं. राऊत यांनी सोमय्यांचं नाव न घेता त्यांच्यावर गंभीर आरोप केले. सोमय्या कोर्लई गावात बंगले शोधायला गेले आहेत. जाऊ द्या. त्यांच्या पाठीपाठी जायला ते काय नेल्सन मंडेला आहेत का? ते काय क्रांतीकारक आहेत का? तो चोर आणि लफंगा आहे. या देशातील सर्वात मोठा चोर लफंगा आणि डाकू कोणी असेल तर तो हाच आहे. त्याच्या विरोधात खंडणीचे गुन्हेही दाखल होणार आहेत. त्याचा खेळ संपणार आहे. तुम्ही पाहत राहा. लवकरच हे बाप-बेटे तुरुंगात जाणार आहेत, असं सांगतानाच अन्वय नाईक यांच्या आत्महत्येसही तेच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना आज पुन्हा सोमय्यांवर घणाघाती हल्ला चढवला.
या किरीट सोमय्यानेही अन्वय नाईकला काही वेळा धमक्या दिल्या होत्या अशी मला माहिती आहे. अर्णवकडे पैसे मागायचे नाही. त्याला बिल मागायचे नाही, अशी धमकी सोमय्यांनी नाईकला दिली होती. माझ्याकडे नव्याने माहिती आली आहे. दोनवेळा सोमय्याने अन्वय नाईकला बोलावून धमकी दिली होती. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. या धमक्यानंतरच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असावा. भाजपच्या लोकांनी त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केले हा मोठा गुन्हा आहे. या लोकांना मराठी माणसाला बदनाम करायचं आहे. हे सर्व नाईकचे हत्यारे आहेत. आणि आज त्याचा हत्यारा त्याच जमिनीवर जात आहे, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला.
त्या जागेचे मूळ मालक अन्वय नाईक आहेत. त्यांना आत्महत्या का करावी लागली यावर हे लोक बोलत नाहीत. अन्वय नाईकला आत्महत्या का करावी लागली यावर भाजपच्या लोकांनी बोललं पाहिजे. ज्याच्यामुळे नाईकला आत्महत्या करावी लागली त्या गुन्हेगाराच्या समर्थनार्थ हे सर्व लोक कोर्टबाजी, पत्रकबाजी करत होते. एका मराठी उद्योजक नाईकने भाजपच्या दबावामुळे आत्महत्या केली आहे. कारण अर्णव गोस्वामीला हे लोक वाचवत होते, असा आरोपही त्यांनी केला.
सोमय्या वेडा माणूस
कोण आहे किरीट सोमय्या सोडून द्या. वेडा माणूस आहे, इकडे तिकडे फिरत असतो. मी कालच सांगितलं तो तुरुंगात जाईल, तो तुरुंगात जाण्याचा मार्ग शोधत आहे. तो पळत आहे इकडे तिकडे, पळू द्या. मी त्यावर बोलणार नाही. लवकरच इथली जनता त्याची धिंड काढेल. तो पुढे लोक मागे. तो पुढे लोक मागे अशी त्याची अवस्था होईल. सोडून द्या. वेट अँड वॉच. तो कुठे जात आहे, बंगले शोधणार आणि घरे शोधणार. तुम्ही त्याच्या मागे जाता. ही काय बातमी आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.