सिंधुदुर्ग (वृत्तसंस्था) भाजपला (BJP) सिंधुदुर्गात खूप मोठा झटका बसला आहे. सेशन कोर्टाने भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. कोर्टात गेल्या दोन दिवसांपासून नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी (hearing on Nitesh Rane bail application) सुरु होती. अखेर कोर्टाने शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) यांच्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा आऱोप शिवसेना नेते संतोष परब यांनी केला. त्यानंतर नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नितेश राणे सभागृहात उपस्थित न राहता अज्ञात स्थळी निघून गेले. त्यानंतर नितेश राणे यांनी एक व्हिडीओ शेअर करत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील पराभव समोर दिसू लागल्याने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करत असल्याचे म्हटले. तर महाविकास आघाडी सुडाच्या भावनेने पोलिस यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला होता.
त्यानंतर पोलिसांनी राणे यांच्या घरी जाऊन नितेश राणे यांचा शोध घेतला मात्र नितेश राणे अज्ञातस्थळी रवाना झाल्याने पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्यानंतर नितेश राणे आणि संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर या प्रकरणाकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मात्र नितेश राणे आणि संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी दिली. तर आपण राणेंना जामीन मिळवून देण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.