इस्लामाबाद (वृत्तसंस्था) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्यावरील विश्वासदर्शक ठरावावर रविवारी मतदान होणार होते. त्यांची सत्ता जाणार, अशीच चर्चा सर्वत्र होती. विरोधकांनी जोरदार तयारीही केली होती. पण प्रत्यक्षात या ठरावावर कामकाज सुरू झाल्यानंतर संसदेच्या उपसभापतींनी हा ठरवा घटनाबाह्य असल्याचे स्पष्ट करत फेटाळून लावला आहे. यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाला संबोधित केलं.
पाकिस्तान संसदेचं कामकाज सुरु झाल्यानंतर अविश्वास ठराव मांडण्यात आला. मात्र मंत्री फवाद चौधरी यांनी संविधानाच्या काही कलमांचा दाखला देत सभापतींना विनंती केली की हा प्रस्ताव घटनाबाह्य आहे. यानंतर उपसभापतींनी इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठराव फेटाळला. यानंतर सभागृहात गोंधळ आणि घोषणाबाजी झाली. विरोधी पक्षाचे नेत्यांनी इम्रान खान यांच्याविरोधात घोषणा दिल्या. परदेशी शक्ती पाकिस्तानचं सरकार पाडण्याचा षडयंत्र रचत असल्याचं उपसभापती म्हणाले.
यानंतर इम्रान खान यांनी देशाला संबोधित केलं. ते म्हणाले की, “मी सभापतीच्या निर्णयानंतर प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाचे आभार मानतो. अविश्वास ठराव हा आमच्याविरोधातील परकीय षडयंत्र होतं. पाकिस्तानी नागरिकांना ठरवायचं आहे की देशावर कोणाचं शासन असावा. कोणत्याही परदेशी शक्तींना हे ठरवण्याचा अधिकार नाही. मीराष्ट्रपतींना संसद विसर्जित करण्याची शिफारस केली आहे. लोकशाही मार्गाने निवडणुका व्हायला हव्या. मी पाकिस्तानच्या नागरिकांना नव्या निवडणुकीची तयारी करण्याचं आवाहन करतो.”