मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे राज्यात चिंताजनक स्थिती निर्माण झालीय. अशावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील नागरिकांना महत्वाचं आवाहन केलं आहे. या क्षणाला डेल्टा प्लसच्या संदर्भात अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपण सध्या कोरोना नियमांचे पालन करून वागावं, एवढीच माझी सूचना राहील. असं टोपे म्हणाले आहेत.
आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितल की, “डेल्टा प्लसच्या संदर्भात दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण साधारण १०० नमूने घेतो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये दर आठवड्याला २५ नमूने घेतो आणि अशा पद्धतीने प्रती महिना आपण डेल्टा प्लसच्या सॅम्पलचं होल जीनोम सिक्वेन्सिंग करतो. हे होल जीनोम सिक्वेन्सिंग आजपर्यंत जे ४ हजार लोकांचं झालं, त्यामध्ये २१ लोक डेल्टा प्लस पॉझिटव्ह आढळले. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला, परंतु उर्वरती सर्वजण बरे होऊ घरी परतले आहेत. त्यामुळे एकदम चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही. डेल्टा प्लसच्या गुणधर्माविषयी अद्यापही स्पष्टता आलेली नाही. वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातात, परंतु आपल्या हाती असलेल्या सध्याच्या आकडेवारीच्या माहितीप्रमाणे निश्चतच जो एक मृत्यू झालेला आहे. तो केवळ डेल्टा प्लसमुळेच झाला, असं म्हणता येणार नाही. त्यामध्ये ८० वर्ष वय, अन्य आजार होते हे देखील कारणीभूत घटक आहेत. डेल्टा प्लसच्या संदर्भात एकूण देशभरात ४८ केसेस आहेत. त्यामुळे या क्षणाला डेल्टा प्लसच्या संदर्भात अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपण सध्या कोरोना नियमांचे पालन करून वागावं, एवढीच माझी सूचना राहील.”
मुंबई महापालिकेकडून सर्वोतपरी प्रयत्न
राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी तिसऱ्या लाटेसाठी सर्व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईत केवळ ३५ दिवसात २१७० बेडच्या कोव्हिड रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर काही शहरांमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिकेकडून सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहे.