भंडारा (वृत्तसंस्था) ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेत थेट ठाकरे सरकारलाच पत्र लिहित आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र, भाजप खासदार सुनील मेंढे (Sunil Mendhe) यांनी नाना पटोले (Nana Patole) यांच्यावरच निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारमध्ये नाना पटोले यांनी कोणीच गंभीरपणे घेत नाही, अशा शब्दात खासदार मेंढे यांनी टीका केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतंच ओबीसी आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेण्यासाठी एक पत्र हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले. पटोले यांनी पत्र देत ठाकरे सरकारने ओबीसी आरक्षणासाठी ठोस पावले न उचलल्यास काँग्रेस राज्यभर आंदोलन छेडेल, असा इशारा पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता. मात्र, ओबीसी आरक्षणावर आक्रमक भूमिका घेतलेल्या पटोले यांनाच खासदार मेंढे यांनी लक्ष्य केले आहे. खासदार मेंढे म्हणाले, ‘नाना पटोलो यांना ठाकरे सरकारमध्ये कोणीही गंभीरपणे घेत नाही. नाना पटोले विधानसभा अध्यक्ष असताना ओबीसी जनगणनेचे ठराव मांडला होता. मात्र, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. त्यांना जर खरंच ओबीसी समुहाबाबत काही करायचे असेल, तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्याचबरोबर ओबीसी नेत्यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी खासदार मेंढे यांनी केली आहे.
पुढे खासदार मेंढे म्हणाले, ‘नाना पटोले, विजय वड्डेटीवार, धनंजय मुंडे यांनी सर्वात आधी राजीनामा द्यावा. मग ओबीसींसाठी राजकीय आरक्षण मागावे, असा सल्ला खासदार सुनील मेंढे यांनी दिला आहे. ‘राज्यात नाना पटोले यांचेच सरकार आहे. त्यांना जर ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचं असतं, तर त्यांनी कधीच मिळवून दिलं असतं, असा खोचक टोलाही खासदार मेंढे यांनी लगावला आहे. पुढे मेंढे म्हणाले, ‘नाना पटोले हे ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून देऊ शकले नाही. त्यामुळे नाना पटोले यांना ठाकरे सरकारमध्ये कोणीही गंभीरपणे घेत नाही हे सिद्ध झाले आहे, अशा शब्दात खासदार सुनील मेंढे यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे.