यावल (प्रतिनिधी) तीन पक्षांच्या सरकारच्या कार्यकाळात कोणीही सुखी नाही, अशी टीका माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी केली आहे. भाजपच्या डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी समर्थ बूथ अभियान कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
येथील धनश्री चित्र मंदिरात हा मेळावा झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन होते. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतमाता, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन व दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन झाले. माजी मंत्री आमदार गिरीष महाजन यांनी भाषणास सुरवात करतानाच माजी आमदार, माजी खासदार हरीभाऊ जावळे यांची उणीव भासत असल्याची जाणीव करून दिली. जिल्हा बँक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल स्थापन करून निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरु असताना, माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी अजून एकच बैठक झाली असून भाजपतर्फे चाचपणी सुरू असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. (कै.) हरीभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांच्या अनुपस्थितीविषयी पक्षाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे यांना विचारणा केली असता, जावळे मुंबईत असल्याने मेळाव्यास उपस्थित राहू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अमोल जावळे यांचे नाव मेळावा पत्रिकेवर खूपच खाली असल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा मेळावास्थळी होती.
दरम्यान, तीन पक्षांच्या सरकारच्या कार्यकाळात कोणीही सुखी नाही. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊनही, पंचनामे नाहीत, मंत्र्यांचे दौरे होऊनही दोन वर्षांत राज्य सरकारने शेतकऱ्यांना दमडीचीही मदत दिली नाही, असा आरोपही गिरीश महाजन यांनी केला.