चाळीसगाव (प्रतिनिधी) अस्सल मराठमोळ्या संस्कृतीचे प्रतिक असणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने महानगरातील दहीहंडी उत्सवांना लाजवेल अशा पद्धतीने भव्य उत्सव चाळीसगाव येथे भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा तर्फे आयोजित करण्यात आला होता. अतिशय रोमहर्षक झालेल्या दहीहंडी स्पर्धेत चाळीसगाव शहरातील नेताजी पालकर चौक, महावीर गोविंदा पथक, व आरंभ ग्रुप तिघांनी सात थरांची दहीहंडी लावत सलामी दिली. यावेळी खान्देशकन्या व सोशल मीडिया इन्फ्लुएनसर निकिता पाटील (संगी ताई) व खान्देशी अभिनेत्री ऋतुजा घोडतुले यांची विशेष उपस्थिती होती.
महिना-दीड महिना अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या तालुक्यातील गोविंदा पथकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून यासाठी प्रथम बक्षीस रु.307777/-, द्वितीय बक्षीस रु.207777/- व तृतीय बक्षीस 107777/- असे तीन बक्षिसे ठेवण्यात आले होते. मात्र तिन्ही गोविंदा पथकांनी सारखे थर लावल्याने बक्षिसांची उत्कंठा अधीकच वाढली. त्यावेळी परीक्षकांच्या निर्णयानुसार कमीत कमी वेळेत थर लावला म्हणून नेताजी पालकर चौक पथकाला प्रथम, महावीर गोविंदा पथकाला द्वितीय व आरंभ ग्रुप गोविंदा पथकाला तृतीय विजेता घोषित करण्यात आले.
मात्र तीनही गोविंदा पथक चाळीसगाव शहरातील असल्याने या दहीहंडी स्पर्धेत कुणीही हरलेले नाही, सर्व चाळीसगाव जिंकले हीच माझी भावना आहे. ज्याप्रमाणे दहीहंडी खेळताना सर्वात कमी वजन उंचीचा गोविंदा सर्वात वर चढवला जातो. त्याचप्रमाणे माझ्या तिन्ही गोविंदा पथकांचा बरोबरीने सन्मान व्हावा म्हणून तीनही गोविंदा पथकांना प्रत्येकी 307777/- रुपये असे सारखे बक्षीस जाहीर केले तसेच उत्तेजनार्थ जिद्दी ग्रुपच्या गोविंदा पथकाने देखील सहा थरांची दहीहंडी लावली त्यांनासुद्धा 151000/- असे विशेष बक्षीस देण्यात आले.
यावेळी खास आकर्षण असलेल्या महिलांची दहीहंडी मध्ये शिवकन्या ग्रुपने आपल्या दहीहंडीचा थर लावला होता. त्यांनादेखील 51000/- रुपये बक्षिस देण्यात आले. दहीहंडीच्या कार्यक्रमात महिलांनी खुलून आनंद घेतला, हे पाहून मनाला अपार समाधान मिळाल्याची भावना आमदार आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली. एवढेच नव्हे तर, महिलांना सुरक्षित आणि आनंददायी वातावरण देण्यासाठी आमचे प्रयत्न यशस्वी होत आहेत याचा आनंद आहे. त्यांच्या आशीर्वादांनी मला अधिक ऊर्जा मिळते. दहीहंडीच्या उत्सवात महिलांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला, हे पाहून खूपच आनंद झाला. आपल्या मतदारसंघातील महिलांना असं सुरक्षित आणि आनंदी पाहणं हीच माझी खरी कमाई आहे. त्यांचे आशीर्वाद माझ्यासाठी खूपच महत्त्वाचे, असेही आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटले.