भंडारा (वृत्तसंस्था) मी आताच पीडित कुटुंबीयांना भेटलो. हात जोडून उभं राहण्याशिवाय मी काहीच करू शकलो नाही. सांत्वन करता येईल असे शब्दच माझ्याकडे नव्हते, असे भावुक उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. भंडार दुर्घटनेतील कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री अत्यंत भावूक झाले होते.
भंडारा जिल्हा समान्य रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत होरपळून मृत्यू पावलेल्या १० नवजात बालकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी भेट दिली आणि त्यांचे सांत्वन केले. यावेळी माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते केवळ या कुटुंबांसमोर मी हात जोडून उभा होतो, अशा शब्दांत या सुन्न करण्याऱ्या दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्री म्हणाले, “आज आम्ही या पीडित कुटुंबांना भेटलो यावेळी त्यांचं सांत्वन करताना त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहण्याशिवाय आमच्याकडे कुठलेही शब्द नव्हते. या प्रकरणाची चौकशी तर झालीच पाहिजे. पण ही दुर्घटना अचानक घडली की आधी अहवाल आल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं हे तपासलं जाईल.” गेल्या वर्षभरापासून आपण कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना आरोग्य यंत्रणेतील इतरही कोणत्या गोष्टींकडे डोळेझाक केली गेली आहे का? याचीही चौकशी करण्याचे आदेश मी कालच दिले आहेत. संपूर्ण राज्यातील सरकारी रुग्णालयांचे लवकरात लवकर सेफ्टी, फायर ऑडिट करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या घटनेच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आपण एक चौकशी टीम तयार केली आहे. चौकशीत कुठलीही कसर राहणार नाही. तर त्यात कोणी जबाबदार असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही, असेही मुख्यमंत्री यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
भंडारा दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नवीन गाईडलाईन तयार करण्यात येणार आहे. राज्यात पुन्हा अशा घटनांमध्ये कुणाचाही जीव जाऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. इलेक्ट्रिक फॉल्टमुळे आग लागली की आणखी काही कारणं आहेत, याचीही चौकशी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोनामुळे आपले कर्मचारी तणावाखाली होती. त्यामुळे काही दुर्लक्ष झालं का? हे सुद्धा तपासण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.