जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची राजकीय रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. उमेदवारी माघारीच्या शेवटच्या दिवसाअखेर तब्बल ३१७ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून, त्यामुळे निवडणूक रिंगणाचे चित्र स्पष्ट झाले आहे. माघारीनंतर आता ७५ जागर्षिकी ६३ जागांसाठी ३२१ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले असून, उर्वरित १२ जागांवर महायुतीचे उमेदवार विनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा
झाला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुरुवातीला मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे प्रभागनिहाय बहुकोनी लढती होण्याची शक्यता होती. मात्र, माघारीच्या अखेरच्या टप्यात प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि स्थानिक पदाधिकान्यांनी सक्रिय भूमिका घेत प्रतिस्पर्धी उमेदवारांची मनधरणी केली. यामुळे जवळपास निम्म्या उमेदवारांनी माघार घेतल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले. माघारीनंतर अनेक प्रभागांमध्ये थेट दोन उमेदवारांमध्येच लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रचार अधिक आक्रमक आणि मुद्देसूद होण्याची शक्यता असून, निवडणुकीची रंगत आणखी वाढणार आहे.
तरुण अन् उच्चशिक्षित उमेदवार
यंदाच्या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तरुण आणि उच्चशिक्षित उमेदवारांची मोठी संख्या. महापालिकेच्या कारभारात नव्या विचारांचे, आधुनिक दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत असून, त्याचे प्रतिबिंब उमेदवारांच्या यादीतून दिसून येत आहे. युवकांसह महिलांचाही सहभाग लक्षणीय असल्याचे चित्र आहे.
















