जळगाव (प्रतिनिधी) तीन वर्षापूर्वीच्या घटनेचा अगदी गपचूप पद्धतीने निंभोरा येथे गुन्हा दाखल होणे, हे गंभीर आहे. अशा पद्धतीने तर कुणीही पाच-सात वर्षापूर्वीची घटना सांगून कोणताही गुन्हा दाखल करेल. परंतू मी अशा गुन्ह्यांना भिक घालत नाही. आम्हालाही जशाला तसे उत्तर देता येते आणि आम्हाला तसे उत्तर द्यायला मजबूर केले जात असल्याचा, गंभीर इशारा आज माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी दिला आहे. ते आज जी.एम. फाऊंडेशनमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
याप्रसंगी आ. गिरीश महाजन झाले की, तीन वर्षापूर्वीची घटना निंभोरा येथे गुन्ह्याच्या स्वरूपात दाखल होणे आश्चर्यकारक आहे. गेल्या वर्षी आपण मंत्री असतांना अॅड. विजय भास्कर पाटील हे आपल्याला भेटले होते. अगदी आम्ही तीन-चार वेळेस एकत्र जेवण देखील केले आहे. यामुळे इतक्या स्वरूपाचा गंभीर गुन्हा नोंदविण्यात आली ही बाब सर्व संशयास्पद आहे. यामुळे हायकोर्टात अपील दाखल केले असून यात कोर्टाने तपास करून मगच गुन्हा दाखल करावा असे निर्देश दिले आहेत. ७ जानेवारीपर्यंत न्यायालयाने दिलासा दिला असल्याची माहिती आ. महाजन यांनी याप्रसंगी दिली.
आ. गिरीश महाजन पुढे म्हणाले की, आमच्याकडे देखील बरेच काही आहे. मात्र आपण खोटे काहीही करणार नसून खरेच करू. दुसरीकडे अॅड. विजय पाटील यांना सर्वजण ओळखतात. त्यांना कुणी तरी चाकू लावेल आणि ते शांत बसतील, असे होणार नाही. अॅड. विजय पाटील यांच्या मागे मोठे हात आहेत. त्यामुळे या प्रकरणी मोबाईल लोकेशनपासून तर सर्व गोष्टी शोधून काढाव्यात, अशी मागणी आपण कोर्टाकडे करणार आहे, असेही श्री. महाजन म्हणाले. जळगाव जिल्ह्यात अशा स्वरूपाचे गलीच्छ राजकारण कधीही केले नाही. मात्र आता तीन वर्षानंतर गुन्हे दाखल करण्याची पध्दत चुकीची आहे. नूतन मराठा या संस्थेशी आमचे काहीही देणे-घेणे नाही. मात्र. यात आम्हाला अडकवण्यात आले आहे. अॅड. विजय पाटील हे मध्यंतरी जेलमध्ये होते. त्यांच्यावर कलम-३०७ सारखा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी आपण पूर्ण खोलवर जाणार असून यातील सूत्रधाराला शोधून काढणार असल्याचा इशारा देखील आ. गिरीश महाजन यांनी दिला. दरम्यान, बीएचआरमध्ये आपले खाते नसून आपण कर्जदारही नाही. मात्र सुनील झंवर यांचा मित्र म्हणून करत असलेली बदनामी ही देखील चुकीची आहे. सुनील झंवर यांचे कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशा सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध असल्याकडेही श्री. महाजन यांनी लक्ष वेधले.
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुंबईतून दबाव आणला गेला. राजकीय हेतूने खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याने मी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे, त्यात मी देखील पुरावे सादर करणार आहे. या गुन्ह्याची माहिती झाल्यानंतर मी पोलिसांना विचारणा केली. तेव्हा पोलिसांनी आमच्यावर मुंबईतून, गृहखात्याकडून दडपण असल्याचे सांगितले आहे. सत्ताधारी पक्षाकडून असा प्रकार होत असेल तर हे अतिशय गंभीर आहे. महाविकास आघाडी सरकारकडून सुडाचे राजकारण केले जात आहे. मी देखील ३० वर्षे राजकारणात आहे, पण मी कधीही असे राजकारण केले नाही. आम्हाला एफआयआरची साधी प्रत मिळाली नाही. यावरून पोलिसांवर किती दबाव आहे, याचा प्रत्यय येत आहे, असेही महाजन यांनी सांगितले.