जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एका ४० वर्षीय व्यक्तीला फेसबुकवर आलेली महिलेची रिक्वेस्ट चांगलीच महागात पडली आहे. अनोळखी महिलेने न्यूड कॉल व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल २ लाखांची मागणी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीसात अज्ञात तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील एका परिसरातील ४० वर्षीय पुरुषाला दि ८ रोजी फेसबुकवर एका मुलीच्या नावाने रिक्वेस्ट आली. संबंधित व्यक्तीने ती रिक्वेस्ट स्वीकारली. यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरु झाले. यानंतर संबंधित महिलेने त्या व्यक्तीचा व्हाटसअप नंबर घेतला व त्या पुरुषाला एकांतात येवून कपडे काढायला सांगितले. त्या महिलेने व्हिडीओ कॉल करीत तो व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करून घेतला. यानंतर त्या ४० वर्षीय पुरुषाला २ लाख रुपये मागितले. तसेच पैसे न दिल्यास तूझा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर तसेच तुझ्या व्हाटसअपवर पाठवेल अशी धमकी देत २ लाखांची मागणी केली. या प्रकरणी ४० वर्षीयव्यक्तीने तत्काळ जळगाव शहरातील सायबर पोलीस स्थानक गाठत संबधित तरुणीच्या नावाने बनविलेले खाते धारकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास लीलाधर कानडे हे करीत आहेत.