नवी दिल्ली (वृत्तसंस्था) वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सुरु असलेल्या टीकेच्या झोडनंतर भाजपने आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांवर कारवाई केली आहे. नुपूर शर्मा आणि नविन जिंदल यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान नविन जिंदाल हे भाजपचे मीडिया प्रभारी आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. या दोघांनाही ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. एका टिव्ही शो मध्ये बोलत असताना भाजप प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्यानंतर पक्षाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
भाजप राष्ट्रीय मुख्यालयाच्या प्रमुख अरुण सिंह यांनी आज याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करणारे निवेदन दिले होतो. यामध्ये शर्मा यांच्याबाबतच्या वादापासून पक्षाने हात झटकत भाजप धार्मिक एकतेवर विश्वास ठेवतो. कोणत्याही धर्मातील पूजनीय व्यक्तींचा अपमान भाजपला मान्य नाही असे म्हटले आहे. तसेच कोणत्याही धर्म किंवा संप्रदायाच्या भावना दुखावणारी वक्तव्ये-विचार भाजपला मान्य नाहीत. असे विचार निंदनीय आहेत. भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात प्रत्येक धर्म या मातीत रूजला व वाढला आहे. भाजप प्रत्येक धर्माचा सन्मान करतो.