जळगाव (प्रतिनिधी) भाजपच्या वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या नावापुढे आक्षेपार्ह उल्लेख दिसल्याने एकच खळबळ उडाली.
कोणत्याही महिलेविरुद्ध आक्षेपार्ह लिहिले जात असेल तर त्याची चौकशीच नव्हे तर त्याला शिक्षा दिली गेली पाहिजे, असा चावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाकायला हवं, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.
या प्रकारासंदर्भात आपल्याला नुकतीच माहिती मिळाली. हा प्रकार अतिशय संतापजनक आहे. कोणत्याही महिलेच्या विरुद्ध कुणी असे आक्षेपार्ह लिहित असेल, तर त्याची फक्त चौकशीच नव्हे, तर त्याला शिक्षा दिली गेली पाहिजे. कारण महिलेचा सन्मान ठेवणारे आमचे राज्य आणि देशही आहे. त्यामुळे असा चावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाकायला हवे” या विषयासंदर्भात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज सकाळी जळगावात आपली प्रतिक्रिया दिली.
खासदार व एकनाथ खडसे यांची सून असणाऱ्या रक्षा खडसे यांच्याबद्दल भाजपाच्या वेबसाइटवर आक्षेपार्ह उल्लेख असल्याचा स्क्रीनशॉट जोडत पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी एक ट्वीट केले आहे. भाजपाची अधिकृत वेबसाइट कोण चालवतं? त्यात महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासोबतच समलैंगी समुदायाचाही अवमान करण्यात आला आहे, असे चतुर्वेदी यांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे. त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनाही या ट्वीटमध्ये टॅग केले आहे. प्रत्यक्षात याबाबत खातरजमा केली असता हा भाषांतराचा गोंधळ असल्याचे दिसत आहे.