जळगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत सोशल मीडियावर कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप करून तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात हेमंत नवनितलाल दुतिया (वय ४८, रा. भाटिया गल्ली, धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २७ मार्च २०२२ रोजी मी माझे पत्नी गौरी, लहान मुलगी व माझे सासरे हारेश प्रेमजी भाटे असे दुपारी ३ वाजेच्या सुमारास जळगाव येथील खान्देश मॉलमधील आयोनॉक्स पिक्चर थिएटरमध्ये ‘द काश्मिर फाईल्स’ हा पिक्चर बघण्यासाठी आलो होतो. पिक्चर संपल्यानंतर सायंकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास आम्ही थिएटर बाहेर आलो. त्यावेळी गुलाब रतन वाघ (रा. मोठा माळीवाडा, धरणगाव), विष्णू रामदास भंगाळे (रा. जळगाव), राजेंद्र किसन महाजन (रा. लहान माळीवाडा, धरणगाव), धीरेंद्र पूरभे (रा. लहान माळीवाडा, धरणगाव), गजानन मालपुरे (रा.जळगाव), शरद तायडे (रा. जळगाव), शोमा चौधरी (रा. जळगाव), सरीता माळी (कोल्हे) (रा. जळगाव), भीमा धनगर (रा. नेहरूनगर धरणगाव) व इतर ४ ते ५ जणांनी मुख्यमंत्री यांच्याविरुद्ध फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट का टाकली? असे विचारले. त्यावेळी मी त्यांना सांगितले कि, मी अशी कोणतीही पोस्ट टाकलेली नाही. तरीदेखील सदर लोकांनी माझ्यावर आरोप घेऊन मला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी माझी पत्नी गौरी ही सोडविण्यासाठी आली. त्यावेळी सदर झटापटीत माझ्या पत्नीचे गळ्यातील मणी मंगळसूत्र तुटुन नुकसान झाले. माझे पत्नीच्या उजव्या हाताला मार लागलेला असुन मला सदर लोकांनी माझे दोन्ही डोळ्यावर नाकावर बुक्यांनी मारहाण केल्याने माझे नाकातून रक्त बाहेर आले. सदर मारहाणीत माझी पत्नी हिचे डोळ्यावर असलेला चष्मा तुटुन फुटुन नुकसान झालेले आहे. आम्हास वाईट साईट शिवीगाळ करून तुम्हास जिवे ठार मारून टाकू असा दम दिला. त्यावेळी माझे सासरे हारेश प्रेमजी भाटे यांनी सोडवासोडव करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सर्जेराव राजाराम क्षीरसागर हे करीत आहेत.