नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोना स्थिती अतिशय चिंताजनक झाली असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या रेकॉर्ड ब्रेक नोंदी होत आहेत. तज्ज्ञ, डॉक्टरांनी वर्तवलेल्या अंदाजापेक्षा कोरोनाची दुसरी लाट फारच भीषण असल्याचे आता दिसत आहे. दरम्यान, देशात कोरोनाचा कहर अद्यापही सुरु असून दैनंदिन रुग्णसंख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर १ हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात कोरोनाचा कहर अद्यापही सुरु असून दैनंदिन रुग्णसंख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशात गेल्या २४ तासात ९३ हजार ५२८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
देशात गेल्या २४ तासात २ लाख ७३९ कोरोना रुग्ण आढळले असून ९३ हजार ५२८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच १, ०३८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ४० लाख ७४ हजार ५६४ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १ कोटी २४ लाख २९ हजार ५६४ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तसंच देशात सध्याच्या घडीला १४ लाख ७१ हजार ८७७ अॅक्टिव्ह रुग्ण असून मृत रुग्णांची संख्या १ लाख ७३ हजार १२३ इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत ११ कोटी ४४ लाख ९३ हजार २३८ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून रोज वाढणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय झाली आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार राज्यात बुधवारी ५८ हजार ९५२ नव्या कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे, तर २४ तासांत ३९ हजार ६२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत २९ लाख ५ हजार ७२१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात २४ तासांत २७८ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर १.६४ टक्के एवढा आहे. राज्यात एकूण ३५ लाख ७८ हजार १६० रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात एकूण सक्रिय रुग्ण ६ लाख १२ हजार ७० इतके आहेत.