मनमाड (प्रतिनिधी) मयत महिलेचा जिवंत असल्याबाबतचा हयातीचा बनावट दाखला सादर करीत बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये असलेल्या खात्यातील १९ लाखांवर डल्ला मारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बँक अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून मनमाड पोलिस स्थानकात तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी एकास अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी महाराष्ट्र बँकेचे अधिकारी मोहम्मद सिराज उद्दीन जाबीर यांनी फिर्याद दिली आहे. सीमा आत्माराम कापडे यांचे या बँकेत पेन्शन खाते आहे. कापडे यांच्या या खात्यातून मार्च २०१८ ते मे २०२५ दरम्यान १९ लाख रुपये काढण्यात आले. सदर महिला हयात असल्याचा दाखलाही वेळोवळी सादर करण्यात आला. मे २०२५ मध्ये निखिल राजेंद्र खरे नामक युवकाने बँकेत येत आपली आई सीमा कापडे यांच्या खात्याची चौकशी केली असता फसणुकीच्या प्रकारास वाचा फुटली. खरे यांनी आपल्या मातेचे २०१८ मध्ये निधन झाल्याची बाब बँकेच्या निदर्शनास आणून दिली. विशेष म्हणजे कापडे यांच्याशी काहीही संबंध नसणाऱ्या तीन संशयितांनी हयातीचा बनावट दाखला सादर करीत आजवर तब्बल १९ लाख लांबविल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी कांता गौतम होशिल, भारत गौतम होंशिल व हेमा भारत होशिल या संशयितांविरोधात मनमाड पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. भारत होंशिल यास अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हेमंत भंगाळे तपास करीत आहेत. दरम्यान, या संशयितांनी रेल्वे विभागातही बनावट कागदपत्रे सादर केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.
 
	    	
 
















