जळगाव (प्रतिनिधी) कौटुंबिक कारणावरुन वाद होवून संतप्त झालेल्या पतीने पत्नीवर कुन्हाडीने वार केले. त्यानंतर स्वतः रेल्वेखोली झोकून देत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील बोरनार गावात घडली. या घटनेमध्ये आनंदा उर्फ महारु धामोळे (वय ४५) यांचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी रेखा धामोळे (वय ४१) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
जळगाव तालुक्यातील बोरनार येथे आनंदा धामोळे हे कुटुंबियांसह वास्तव्यास असून ते शेती करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. मंगळवार दि. १९ रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास धामोळे दाम्पत्यामध्ये कौटुंबिक कारणावरुन वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या आनंदा धामोळे यांनी रागाच्या भरात पत्नी रेखा यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात रेखा धामोळे गंभीर जखमी होवून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. पत्नीचा मृत्यू झाला असे समजून, आनंदा धामोळे यांनी सकाळी ६ वाजता घराबाहेर पडले आणि त्यांनी म्हसावद रेल्वे गेटजवळ जावून त्यांनी धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केली.
गंभीर जखमी महिलेला हलवले छत्रपती संभाजीनगरला
पतीने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रेखा धामोळे यांना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले असून, त्यांची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
पत्नीवर कुऱ्हाडीने वार करत पतीची रेल्वेखाली आत्महत्या
रेल्वे रुळावर आढळला वडीलांचा मृतदेह
आई रक्ताच्या थारोळ्यात घरात गंभीर जखमी अवस्थेत पडलेली होती. तर वडील घरात दिसून आले नाही. त्यामुळे मुलांनी ग्रामस्थांच्या मदतीने आनंदा धामोळे यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास धामोळे यांचा मृतदेह म्हसावद रेल्वे गेटजवळील रुळावर आढळून आला.
घटनेमुळे दोघ मुलांवर आघात
आनंदा धामोळे यांचा मोठा मुलगा विनोद याने आयटीआयचे शिक्षण घेतले आहे. तर लहान मुलगा पप्पु हा दहावीत शिकत आहे. त्यांच्यासह घरात आनंदा धामोळे यांच्या आई या देखील राहतात. मात्र, त्या दोन दिवसांपासून जळगाव येथे आपल्या मुलीकडे आल्या होत्या. कौटुंबिक वादातून वडीलांनी आईवर कुऱ्हाडीने वार केले, त्यानंतर स्वतः रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. तसेच गंभीर जखमी झालेल्या आईची मृत्यूशी झुंज सुरु आहे. या घटनेमुळे दोघ मुलांवर आघात झाला आहे.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला केले रुग्णालयात दाखल
धामोळे दाम्पत्याला विनोद आणि पप्पू ही दोन मुले आहे. ते घटनेच्या वेळी खालच्या घरात झोपलेले होते, तर दाम्पत्य हे वरच्या खोलीत झोपलेले होते. सकाळी ६ वाजता मोठा मुलगा विनोद हा झोपेतून उठल्यानंतर तो वरच्या खोलीत गेला. यावेळी त्याला आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसताच त्याला धक्का बसला. त्याने शेजारच्यांच्या मदतीने जखमी अवस्थेत असलेल्या आईला रुग्णालयात हलविले.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये काही विषयांवरून किरकोळ वाद सुरू होते. मंगळवारी पहाटेही त्यांच्यात वाद झाले, याच वादातून हा दुर्दैवी प्रकार घडला. मात्र, या वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.