चंद्रपूर (वृत्तसंस्था) दारुड्या पतीच्या जाचाला कंटाळून ऐन दसऱ्याच्या दिवशी पत्नीने मद्यपी पतीची हत्या केल्याची खळबळजनक घटना चंद्रपुरातील नगीनाबागमध्ये सकाळी घडली. नीलकंठ चौधरी (५२) असे मृताचे नाव आहे. रामनगर पोलिसांनी हत्येप्रकरणी पत्नी, मुलगी व मेव्हणा अशा तिघांना अटक केली आहे.
शहरातील नगीनाबाग वॉर्डात नीळकंठ चौधरी हा पत्नी मंगला चौधरी (५०) व मुलगी शिल्पा चौधरी (१८) यांच्यासह वास्तव्याला होता. तो मोलमजुरी करायचा परंतु, त्याला दारूचे व्यसन असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे तो नेहमीच पत्नी व मुलीशी भांडण करायचा. दरम्यान, मंगळवार, २४ ऑक्टोबर रोजी मंगला चौधरी हिचा भाऊ विलास लटारू शेंडे (५५) रा. सुशी दाबगाव (मूल) हा चौधरी कुटुंबाकडे आला. यावेळीही चौधरी दाम्पत्यात वाद सुरू झाला.
यावेळी वाद एवढा विकोपाला गेला की, पत्नी मंगला, मुलगी शिल्पा व विलास शेंडे यांनी मिळून नीळकंठला लोखंडी रॉड व बांबुने जबर मारहाण केली. या मारहाणीत नीळकंठ याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपींविरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून मृतकाची पत्नी मंगला चौधरी, मुलगी शिल्पा व मेव्हणा विलास शेंडे या तिघांना अटक केली.
तिनही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाले, हवालदार राहुल सहारे, देवीदास राठोड करीत आहेत.