बीड (वृत्तसंस्था) नेहमीप्रमाणे सकाळी शिरूर येथील महाविद्यालयात कर्तव्यावर जात असलेल्या दोन प्राध्यापकांच्या दुचाकीचा आणि कारचा भीषण अपघात झाला. यामधे दोन्ही प्राध्यापकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बीड शहराजवळील मुर्शदपूर फाटा येथे सोमवारी (दि. ३) सकाळी घडली.
शिरुर तालुक्यातील जाटनांदूर येथील प्राध्यापक शहादेव शिवाजी डोंगर (वय ४४ रा. जाटनांदूर ता. शिरूर) व प्राध्यापक अंकुश साहेबराव गव्हाणे ( रा. पाली ता.बीड) अशी मयत प्राध्यापकांची नावे आहेत. दोघंही शिरूर येथील कालिकादेवी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बीड येथून महाविद्यालयाकडे दुचाकीवरून जात होते.
यावेळी कारने (एमएच १४ जेई ५३७२ ) दुचाकीला जोराची धडक दिली. हा अपघात शहराजवळ नगर रोडवरील मुर्शदपुर फाट्याजवळ झाला. यामधे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की दुचाकी जळून खाक झाली. तर, कारमधील चालक देखील जखमी झाला आहे. गुरुपोर्णिमेच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात.
प्रा. शहादेव डोंगर यांचा अंत्यविधी जाटनांदूर येथे झाला. यावेळी संपूर्ण गाव अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. पतीच्या दुर्दैवी निधनाने पत्नी आणि मुलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. चार साडेचार महिन्यांपूर्वीच प्रा. डोंगर यांच्या वडिलांचे निधन झाले होते. प्रा. डोंगर यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा एक मुलगी, भाऊ-भावजय असा परिवार आहे.
प्रा. अंकुश गव्हाणे हे शारीरिक शिक्षण क्रीडा शिक्षक म्हणून २००७ पासून कार्यरत होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी बीड येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली, एक मुलगा असा परिवार आहे. दरम्यान, गुरुपौर्णिमेच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना समोर आल्याने बीड शहरासह शिरूरच्या कालीकादेवी महाविद्यालयात शोककळा पसरली.