चाळीसगाव (प्रतिनिधी) कोरोना महामारीमुळे आपल्या देशाला आरोग्य व्यवस्था बळकट असणे व आरोग्याची काळजी घेणारे प्रशिक्षित घटक गावात असणे किती आवश्यक आहे. याची जाणीव झाली. येणाऱ्या काळात माता व लहान मुलांची तसेच वृद्धांची काळजी घेणारे आरोग्यदूत गावागावात निर्माण व्हावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पुढाकाराने संपर्क युनिसेफ व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मार्फत चाळीसगाव तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना जनरल ड्युटी असिस्टंट (GDA) कोर्सचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले होते.
सदर ३ महिन्यांचा कोर्स परिपूर्ण करणाऱ्या १३ उमेदवारांना प्रमाणपत्रांचे वाटप आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कार्यालयात करण्यात आले. यावेळी संपर्क युनिसेफ फाउंडेशनच्या मीनाकुमारी यादव, तुषार गायकवाड, प्रथम एज्युकेशनचे ज्ञानेश्वर राठोड, आमदार कार्यालयाचे दिनकर राठोड आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे जनरल ड्युटी असिस्टंट (GDA) हा कोर्स पूर्ण करणाऱ्या १३ पैकी १२ उमेदवारांना चाळीसगाव शहरातीलच रुग्णालयात नोकरी मिळाली आहे. तसेच एक उमेदवार आरोग्य क्षेत्रात उच्च शिक्षण घेत आहे. रुग्णालयांना देखील रुग्णांच्या सुश्रुषेसाठी प्रशिक्षित कर्मचारी मिळत असल्याने त्यांनी देखील या उमेदवारांना प्राधान्याने नियुक्ती दिल्या.














