चाळीसगाव (प्रतिनिधी) संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला उपस्थित राहून संत सेवालाल महाराज यांना अभिवादन करून आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्यात.
आ. मंगेशदादा चव्हाण यांनी सोशल मीडियात शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महापुरुष व त्यांचे विचार सर्व समाजासाठी प्रेरक असतात. केवळ जयंती आली म्हणून जय बोलून नाही तर प्रत्यक्ष कामाच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्याचा माझा प्रयत्न असतो. चाळीसगाव मतदारसंघाचा आमदार या नात्याने संत सेवालाल महाराज यांच्या विचारांवर काम करत बंजारा समाज, तांडे यांच्यासाठी काम करण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे.
दि.२५ ते ३० जानेवारी २०२३ दरम्यान जामनेर तालुक्यातील गोद्री बंजारा महाकुंभ येथे चाळीसगाव तालुक्यातून बंजारा बांधवांना दररोज येण्याजाण्याची मोफत वाहन व्यवस्था केली होती. या महाकुंभाच्या माध्यमातून समाज एकत्र झाला व त्याची दखल घेत राज्य शासनाकडून संत सेवालाल महाराज बंजारा,लबाण तांडा समृद्धी योजना मंजूर करण्यात आली. त्यात ५०० कोटी निधीची तरतूद केली असून याचा फायदा चाळीसगाव तालुक्यातील ५० हुन अधिक बंजारा तांड्याना होणार आहे.
चाळीसगाव तालुक्यातील हजारो ऊसतोड कामगार बंजारा समाजातील आहेत. ते उसतोडीला जातात तेव्हा त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो. त्यांच्या भविष्यासाठी चाळीसगाव तालुक्यात मुलांसाठी १ व मुलींसाठी १ असे प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेचे २ वस्तीगृहांना शासनाची मान्यता मिळाली आहे. केवळ मान्यता नाही तर या शैक्षणिक वर्षापासून प्रत्यक्ष सुरुवात देखील होणार आहे.
श्रीक्षेत्र पोहरादेवी सेवाध्वज स्थापना व संत सेवालाल महाराज पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या वेळी चाळीसगाव तालुक्यातून ७० मोफत वाहनांच्या माध्यमातून हजारो भाविकांना आपण ११ फेब्रुवारी २०२३ रोजी पोहरादेवी दर्शन घडवले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व बजेट च्या निधीतून अनेक तांड्यांना स्वातंत्र्यानंतर प्रथमच पक्के रस्ते. बनवले जात आहेत. ही सर्व कामे मी केवळ बोलत नाही किंवा आश्वासन देत नाही तर सुरू आहेत.
चाळीसगाव तालुक्यातील ३२ ताड्यांना स्वातंत्र्यानंतर प्रथमच पोलीस पाटील पदभरती आपण केली. तर ३ मोठ्या ताड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत विभाजन केले व अजून दोन तांडे प्रस्तावित आहेत. मागील जयंतीनिमित्त याच ठिकाणी मी चाळीसगाव तालुक्यात संत सेवालाल महाराज यांच्या नावाने सेवालाल भवन उभारण्याचे आश्वासन दिले होते. आज चाळीसगाव तालुक्यातील २१ बंजारा तांडा मध्ये सेवालाल भवन बांधकामासाठी ३ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून अनेक कामे पूर्णत्वास आली आहेत. भविष्यात अजून करण्यात येतील.
बंजारा समाज ज्या प्रवर्गात येतो त्या विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाचा मोदी आवास योजनेत समावेश नसल्याने तालुक्यातील बहुतांश बंजारा लाभार्थी वंचित राहत होता. मात्र आपण राज्य शासनाकडे पाठपुरावा करून नवीन शासन निर्णय निर्गमित केला व आज तालुक्यातील सर्व बंजारा समाजाला या योजनेचा लाभ होत आहे.
जाणजो छाणजो, पचज माणजो |
जय सेवालाल..!
– आमदार मंगेश रमेश चव्हाण