जळगाव (प्रतिनिधी) वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा करण्यासाठी गेलेल्या सुनंदा सदाशिव पाटील (वय ६७, रा. श्रीकृष्ण कॉलनी) यांच्या गळ्यातून चार तोळ्यांची मंगलपोत चोरुन नेली. ही घटना शुक्रवार दि. २१ जून रोजी श्रीकृष्ण कॉलनीत घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील रिंगरोड परिसरातील श्रीकृष्ण कॉलनीत सुनंदा पाटील या वास्तव्यास आहेत. शुक्रवारी असलेल्या वटपौर्णिमेनिमित्त श्रीकृष्ण कॉलनीतील दत्त मंदिराच्या बाहेर असलेल्या वडाच्या झाडाजवळ पूजन करण्यात येत होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास सुनंदा पाटील या देखील त्याठिकाणी पुजेसाठी गेल्या होत्या. मात्र महिलांची गर्दी असल्याने त्या तेथेच थांबल्या. त्यांनी डोक्याला बांधलेला रुमाल सोडला असता, त्यांना आपल्या गळ्यातील मंगलपोत गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी त्यांच्या पतीला याविषयी सांगितले असता तेदेखील तेथे पोहचले. त्यांनी मंगलपोत कोणी चोरताना दिसले का, या विषयी तेथे असलेल्या महिला व आजूबाजूच्या नागरिकांना विचारणा केली असता सर्वांनी नकार दिला.
वडाच्या झाडापर्यंत जाईपर्यंत त्यांच्या गळ्यात मंगलपोत होती. मात्र वटपौर्णिमेनिमित्त पूजनासाठी मोठी गर्दी झाली होती. या गर्दीत चोरीच्या उद्देशाने बाहेरील कोणी महिला आल्या होत्या की काय?, अशी शंका महिलेचे पती सदाशिव पाटील यांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी सुनंदा पाटील यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नरेश सोनवणे करीत आहेत.