धरणगाव (प्रतिनिधी) गुरे चारण्यासाठी तापी काठच्या शेत शिवाराकडे गेलेल्या एकाचा मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील नांदेड गावात घडली आहे. सुकदेव धनसिंग कोळी (वय ४८), असे मृताचे नाव आहे. ही घटना बुधवार ६ रोजी घडली.
तापी नदीकाठालगतच्या शेतशिवाराकडे सुकदेव कोळी हा गुरुवारी गुरे चारण्यासाठी गेला होता. दुपारी गुरे चरत असताना अचानक आगेमोहळाच्या मधमाश्यांनी त्याच्यावर हल्ला केला. मधमाश्यांनी त्याच्या संपूर्ण चेहऱ्यासह हातापायांवर कडाडून चावा घेतला. त्यात तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत तो तेथेच पडून होता.
सायंकाळी तो घरी न परतल्याने त्याचे नातलग व घराजवळील काही लोक शोध घेण्यासाठी गेले असता तो अत्यवस्थ स्थितीत तेथेच पडून असल्याने दिसून आले. घरी आणून त्याच्यावर खासगी डॉक्टरांद्वारे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना त्याचा रात्री मृत्यू झाला. याबाबत धरणगाव पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यू झाली असून पुढील तपास पोहेकॉ प्रदीप पवार हे करीत आहेत.