जळगाव (प्रतिनिधी) दुचाकीवरुन जातांना मुलीकडे पाहून भुंकण्याच्या कारणावरून दोन गटात दोन दिवसांपासून वाद सुरु होता. रविवारी दुपारच्या सुमारास हा वाद पुन्हा उफळून आल्याने त्यांच्यामध्ये पुन्हा हाणामारी झाली. यामध्ये एकनाथ निंबा महाजन (गोपाळ) (वय ५५, रा. बिलवाडी, ता. जळगाव) यांना जबर मारहाण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर दोन्ही गटातील सुमारे १२ जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास बिलवाडी येथे घडली असून याठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मयताचे नातेवाईक रेखाबाई गोपाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री त्यांचे सासरे रामदास गोपाळ हे वावडदा येथून बिलवाडी येथे येत असतांना ते रस्त्यावर थुंकले होते. त्यावरुन गावातील पाटील कुटुंबातील एकाने त्यांच्यासोबत माझ्यासोबत असलेल्या मुलीला बघून तुम्ही थुकले या कारणावरुन वाद घातला. रात्रीच्या सुमारास दोन्ही गटाने एकमेकांना बोलून हा वाद मिटवला होता. रविवारी दुपारच्या सुमारास एकनाथ महाजन हे बकऱ्या चारून घरी येत असताना पाटील कुटुंबातील एकाने पुन्हा त्यांच्यासोबत वाद घातला. त्यांच्यातील वाद वाढत जाऊन दोन्ही कुटुंब एकमेकांना भिडले. त्यांच्याकडून बांधकाम साहित्य, पावडी, लाकडी दांड्याचा वापर करीत एकमेकांना मारहाण करीत करीत गंभीर जखमी केले. या मारहाणीत एकनाथ महाजन यांना जबर मार लागून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.
दोन्ही गटातील १२ जण गंभीर जखमी
या हाणामारीच्या घटनेत दोन्ही कुटुंबांमधील १२ जण जखमी झाले असून त्यामध्ये किरण देविदास पाटील (वय २८), मीराबाई सुभाष पाटील (वय ४८), ज्ञानेश्वर काशिनाथ पाटील (वय ४०), दीपक ज्ञानेश्वर पाटील (वय २३), संगीता रोहिदास पाटील (वय ४०), कमलेश प्रमोद पाटील (वय २६), जनाबाई एकनाथ गोपाळ (वय ५५), ज्ञानेश्वर एकनाथ गोपाळ (वय ३५), समाधान हिलाल गोपाळ (वय ३५), गणेश एकनाथ गोपाळ (वय २७), गौरव अर्जुन गोपाळ (वय ३१), भीमराव एकनाथ गोपाळ यांचा समावेश आहे.
जिल्हा रुग्णालयात आक्रोश अन् महिला आक्रमक
मारहाणीत एकनाथ गोपाळ यांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयात मयताच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यावेळी महिलांनी आक्रोश करीत त्या आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी आम्हाला आतमध्ये जाऊ द्या, असा आग्रह करीत चॅनल गेट उघडण्याचा प्रयत्न करीत होत्या. मात्र पोलिसांनी सर्वांना रोखत आतमध्ये प्रवेश नाकारला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्यासह सर्व पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, दुय्यक अधिकारी, अंमलदार, क्यूआरटी पथक तैनात होते.
जिल्हा रुग्णालयात दोन्ही गट भिडले
जखमींना तात्काळ त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी दोन्ही गट पुन्हा समोरासमोर येवून एकमेकांना भिडले. त्यानंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना शिवीगाळ करीत जखमी एकमेकांकडे धावून जाण्याचा प्रयत्न करीत होते.
















