जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील भादली येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंजली पाटील नामक तृतीयपंथीयाने सर्वसाधारण महिला प्रवर्गाची जागा असलेल्या एका वॉर्डातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतू तृतीयपंथीय असल्याने त्यांना सर्वसाधारण महिला प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही, असे कारण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, आता अंजली पाटील या तृतीयपंथीला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलासा दिला असून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अंजली पाटील यांन स्त्री राखीव प्रवर्गातील उमेदवारी करण्याची परवानगी दिली आहे.
जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथील अंजली पाटील (गुरू संजना जान) या तृतीयपंथीने ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांसाठी राखीव असलेल्या प्रवर्गातून आपली उमेदवारी दाखल केली होती. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेवेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अंजली पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली होती. मतदार यादीत त्यांच्या नावापुढे लिंगाचा उल्लेख ‘इतर’ असा असल्याने, त्यांना महिला राखीव प्रवर्गातून उमेदवारी दाखल करता येणार नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. परंतु, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर अंजली पाटील यांचे समाधान झाले नव्हते. त्यांनी आपली उमेदवारी वैध असून चुकीच्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज बाद केल्याचा आरोप केला होता. आपल्याकडे केंद्र सरकारने दिलेले आधार कार्ड तसेच मतदान कार्डावर तृतीयपंथी असा उल्लेख आहे. याशिवाय आपल्याकडे सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र देखील असल्याने महिला राखीव प्रवर्गातून आपली उमेदवारी योग्य असल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार अचूक निर्णय दिल्याचे स्पष्ट केल्याने हे प्रकरण चिघळले होते.
तृतीयपंथीय अंजली पाटील यांनी सांगितले की, मी एक तृतीयपंथीय आहे. सर्टिफाईड ट्रान्सजेंडर असल्याबाबत माझ्याकडे प्राधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र आहे. एवढेच नव्हे तर भारत सरकारने दिलेले आधार कार्ड, मतदार ओळखपत्रही आहे. त्यावर देखील माझा तृतीयपंथीय म्हणून उल्लेख आहे. त्यामुळे मला निवडणूक लढवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने माझा उमेदवारी अर्ज बाद केला आहे. यानंतर तृतीयपंथी अंजली पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. अॅड. आनंद भंडारी यांनी तृतीयपंथी अंजली पाटील यांची बाजू मांडली. तृतीयपंथी व्यक्ती अधिकार संरक्षण कायदा २०१९ नुसार लिंग निवडण्याचा अधिकार तृतीयपंथी व्यक्तीला आहे. याबाबीकडे अॅड. आनंद भंडारी यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यानुसार खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी अंजली यांच्या बाजूने निकाल देत त्यांचा निवडणूक अर्ज स्त्री राखीव प्रवर्गातून वैध असल्याचे स्पष्ट केले.
खंडपीठाने अंजली पाटील यांना ग्रामपंचायत निवडणुकीत स्त्री राखीव प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मान्यता दिली आहे. उमेदवारी अर्जासंदर्भात अंजली पाटील यांच्या बाजूने खंडपीठाने निर्णय दिला खरा, परंतु, भविष्यात त्यांना पुरुष म्हणून कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही. तशी सवलत मिळण्यास त्या पात्र राहणार नाहीत, असेही निकाल देताना न्यायालयाने स्पष्ट केले आहे.