मुंबई (वृत्तसंस्था) राज्यसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला असताना आता विधान परिषदेच्या उमेवारांची नावे समोर येऊ लागली आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही दोन नावे अंतिम झाल्याचे समजत असून माजी मंत्री एकनाथराव खडसे (Eknath Khadse) व रामराजे निंबाळकर (Ramraje Nimalkar) यांना विधानपरिषदेत संधी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महाराष्ट्रातील बड्या आणि दिग्गज नेत्यांमध्ये एकनाथराव खडसे यांचं नाव घेतलं जातं. एकनाथराव खडसे यांनी अनेकवर्ष भाजपसाठी काम केलं. राज्यात भाजपच्या विस्तारात खडसेंचा वाटा महत्त्वाचा मानला जातो. पण भाजपमधील अंतर्गत मतभेदामुळे पुढे खडसे भाजपमधून बाहेर पडले. खडसे त्यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघातून दोन दशक आमदार म्हणून निवडून आलेआहेत. त्यांना भाजप सरकारच्या काळात मंत्रीपदही मिळालं. ते राज्याचे महसूल मंत्री होते. पण मंत्री असताना त्यांनी अवैधपणे जमीन खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकीर्दीला उतार आला. तरीही खडसे खचले नाही. त्यांना 2019 च्या निवडणुकीत भाजपकडून तिकीट मिळालं नाही. त्यानंतर त्यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसेंचं पूनर्वसन करण्याचा प्रयत्न पक्षाकडून सुरु होता. त्यासाठी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत खडसेचं नाव पाठवण्यात आलं होतं. पण राज्यपालांनी दोन-अडीच वर्षानंतरही आमदारांची निवड केली नाही. अखेर एकनाथराव खडसेंचा राजकीय वनवास थांबवण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. विधान परिषदेत ते निवडून आले तर कदाचित त्यांना मंत्रिमपदाची देखील संधी मिळू शकते.