मुंबई (वृत्तसंस्था) राज्य मंत्रिमंडळाचा 40 दिवसांपासून लांबलेला विस्तार अखेर आज सकाळी 11 वाजता राजभवन येथे होणार आहे. या वेळी भाजपचे आणि शिंदेसेनेचे प्रत्येकी 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.
भाजप आणि शिंदे गटाचे मिळून एकूण 18 मंत्री आज शपथ घेणार आहेत. शिंदे गटाच्या नऊ तर भाजपच्या 9 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. विशेष म्हणजे भाजपचे आणखी 2 जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यात एक महिला असणार आहे. पण हे दोन जण कोण हे अद्याप समोर आलेलं नाही. अब्दुल सत्तार यांच्या मुलांवर टीईटी घोटाळ्याचे आरोप होताच, आपले नाव मंत्रिमंडळातून डावलण्याची शक्यता असल्याचा अंदाज सत्तार यांना आला होता. त्यामुळे सत्तार कालपासून मुंबईत ठाण मांडून आहेत. फक्त एकनाथ शिंदेच नाही तर भाजपमधील आपल्या जुन्या मित्रांच्या मदतीने सुद्धा त्यांच्याकडून प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सत्तार यांना मंत्रीपद मिळणार की संधी हुकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भाजपचे संभाव्य मंत्री : चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे, विजय गावित, अतुल सावे, गणेश नाईक, चंद्रशेखर बावनकुळे.
शिंदे गटाचे संभाव्य मंत्री : गुलाबराव पाटील, संदिपान भुमरे, दादा भुसे, संजय शिरसाट, उदय सामंत, दीपक केसरकर, सदा सरवणकर, शंभूराज देसाई व अपक्ष बच्चू कडू यांनाही स्थान मिळू शकते.