पाळधी (शहबाज देशपांडे) पूर्वी कार्यकर्ता म्हणून आंदोलनात पोलिसांशी सामना व्हायचा, पण आज मंत्री म्हणून त्यांच्या बळकटीसाठी काम करण्याची संधी मिळतेय, हे माझं भाग्य आहे. जिल्ह्यातील पोलिसांसाठी निधीची कमतरता भासू दिली नाही आणि पुढेही भासू देणार नाही, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, ‘पाळधी दूरक्षेत्र’ ही इमारत म्हणजे केवळ इमारत नाही, तर माणसांच्या सुरक्षिततेचे मंदिर आहे. डीपीडीसीमार्फत तब्बल चार कोटी तेवीस लाख रुपये मंजूर करून हे स्वप्न साकार करण्यात आले आहे.
पहिले लिफ्ट असलेले पोलीस स्टेशन
धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी पोलीस दूरक्षेत्राच्या नव्या दुमजल्याच्या भव्य इमारतीचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सुमारे ५ हजार चौरस फूट जागेत उभारलेल्या या अत्याधुनिक इमारतीत १४ दालने, सुसज्ज फर्निच, सोलर सिस्टीम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वातानुकूलित कार्यालयीन व्यवस्था; तसेच लिफ्ट सुविधा उपलब्ध असून, त्यामुळे या इमारतीला उत्तर महाराष्ट्रातील पहिले लिफ्ट असलेले पोलीस स्टेशन ही विशेष ओळख मिळाली आहे.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी म्हणाले, “माझ्या कार्यकाळातील ग्रामीण भागातील लिफ्ट असलेले हे पहिले पोलीस स्टेशन आहे आणि तेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने उभे राहिले, याचा मला अभिमान आहे.”
ते पुढे म्हणाले, “जिल्ह्यातील पोलिसांचे बळकटीकरण व्हावे यासाठी पालकमंत्र्यांनी घेतलेले पुढाकार अनमोल आहेत. फोर व्हीलरपासून टू व्हीलर आणि शेवटच्या पोलिस घटकांपर्यंत बळकटीकरणाचे कार्य यशस्वीपणे होत आहे.”
यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हाधिकारी रोहन पुरी, पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेडी अपर पोलीस अधीक्षक कविला नेरकर, उप विभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप, जि.प. चे माजी सदस्य प्रतापराव पाटील, सा. वा. वे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत, उप कार्यकारी अभियंता एस. डी. पाटील, सरपंच विजय पाटील, लक्ष्मी कोळी, पोलिस निरीक्षक सुनिल पवार, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे, सा.बा.चे शाखा अभियंता सचिन सपकाळे, लोकेश माळी, जितेंद्र कोळी, गव्हर्मेंट कॉन्टॅक्टर एम. एस. जैन, उद्योगपती शरदचंद्र कासट, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, खंडारे यांच्यासह पोलिस वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूचनाचालन प्रा. दीपक पवार यांनी केले आभार पोनि सुनिल पवार यांनी मानले. तर नियोजन जि. प. माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले होते.
















