मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा भगवा फडकवण्याचा घोषणाबाजी केल्याचा तीव्र समाचार घेतला. ‘भाजपला मुंबईतील शेअर बाजारात, जमीनीतील आर्थिक उलाढालीची आवड आहे. त्यांना मुंबई-दिल्लीची पायपुसणं बनवल असून आम्ही तसे होऊ देणार नाही. शिवरायांचा भगवा मुंबई महापालिकेतून 100 पिढ्यांपर्यंत कोणीही उतरवू शकत नाही, असं राऊत म्हणाले.
मुंबईत बुधवारी पार पडलेल्या पक्षाच्या कार्यकारिणीला मार्गदर्शन करताना फडणवीस यांनी मुंबई महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्याचा निर्धार बोलून दाखवला. ‘डोक्यात सत्ता गेली की पतन अटळ असते आणि मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारी सत्ता बदलण्याची वेळ आता आली आहे,’ असं ते म्हणाले होते. संजय राऊत यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना फडणवीसांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला.
‘फडणवीस हे विरोधी पक्षाचे नेते असल्यामुळं त्यांनी असं बोलणं हे त्यांच्या राजकारणासाठी सोयीचं आहे. राजकारणात कोणी वेगळी भूमिका घेतली म्हणून त्यांच्या अंगावर जाण्याची आमची परंपरा नाही. एका मर्यादेत कोणीही आपली भूमिका मांडू शकतो. मात्र, आमच्यासाठी शिवरायांचा भगवा हा एकच भगवा आहे. त्यामुळं मुंबईवर आता जो छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकतोय तो शुद्ध आहे की फडणवीसांचा भगवा शुद्ध आहे याचा निर्णय मुंबईकर घेतील,’ असं राऊत म्हणाले.