जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यासह राज्यात कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर असून या वाढत्या कोरोनाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री डॉ. सतीष पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे. सध्या शासन करित असलेल्या उपाय योजनांबाबत त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली. तर विरोधीपक्ष या गंभीर स्थितीत काम न करता टीका करीत आहे. हे बरोबर नाही, असा टोला डॉ. सतीष पाटील यांनी विरोधकांना लगावलाय.
जळगावसह राज्यात कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. मात्र त्याला लॉकडाऊन करून चालणार नाही. तर राज्यातील मंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन दोन दिवस आढवत घेवून प्रशासन गतिमान केल्यास परिस्थिती आटोक्यात येईल. असा घरचा आहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री डॉ. सतीष पाटील यांनी दिला.
राज्यातील सत्ताधारी मंत्र्यांबाबत ते म्हणाले, “पक्ष बांधणीसाठी या मंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात दोन तीन दिवस मुक्काम केला. परंतु कोरोनाची साथ वाढत असताना याच मंत्रांनी जनतेला वाऱ्यावर सोडले असल्याचे दिसत आहे. कोरोना नियंत्रित करण्यासाठी लॉकडाऊन करण्याचे सुचविले जाते आहे. मात्र हा उपाय होऊ शकत नाही. सरकारने प्रशासन गतिमान करण्यासाठी मंत्र्यांना प्रत्येक जिल्ह्यात दोन ते तीन दिवस पाठवून त्याठिकाणी तालुकानिहाय बैठका घेऊन आरोग्याचा आढवा घ्यावा,”
ते पुढे म्हणाले, “आरोग्य यंत्रणा तसेच ज्या ठिकाणी आवश्यक असेल तेथे पोलिस यंत्रणा गतिमान करावी. त्यामुळे ग्रामीण भागापर्यंत नियोजन होवून परिस्थिती आटोक्यात येईल. केवळ मुंबई त बसून निर्णय घेवून प्रशासन चालणार नाही. कारण आता परिस्तिथी आणीबाणीची आहे. त्यामुळे आता मंत्र्यांनी हलले पाहिजे. विरोधकांनी आता टीका न करता साथ दिली पाहिजे तरच ही स्थिती आटोक्यात येईल.” असे डॉ. सतीष पाटील म्हणाले.