नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीत असे सरकार आहे, ज्याने माईक बांधून सर्व मजुरांना घरी जाण्याची घोषणा केली. काँग्रेसच्या पापामुळे यूपी, उत्तराखंड, पंजाबमधील लोक कोरोनाच्या विळख्यात आले, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केला आहे.
सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता मोदी लोकसभेत बोलण्यासाठी उभे राहिले. सुरुवातील मोदींना स्वर कोकिळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. लता दीदी यांनी देशाला एका धाग्यात बांधल्याचे काम केले. त्यांच्या गाण्यांनी संपूर्ण देशाला प्रेरणा दिली. असे मोदी म्हणाले. त्यानंतर मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. मोदी म्हणाले की, ‘देशात लॉकडाऊन सुरू असताना सर्व तज्ज्ञ सांगत होते की, जिथे आहात तिथेच राहा, मात्र तेव्हा काँग्रेसच्या लोकांनी मुंबईतील रेल्वे स्टेशनवर मजुरांना मोफत तिकीट दिले, आणि लोकांना सांगितले की, तुम्ही यूपी आणि बिहारचे आहात, तिथे जाऊन कोरोना पसरवा. असे करुन काँग्रेसने मोठे पाप केले आहे.’ असा थेट आरोप पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर केला आहे.
पुढे मोदी म्हणाले की, दिल्लीत असे सरकार आहे, ज्याने माईक बांधून सर्व मजुरांना घरी जाण्याची घोषणा केली. काँग्रेसच्या पापामुळे यूपी, उत्तराखंड, पंजाबमधील लोक कोरोनाच्या विळख्यात आले. पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान काँग्रेसकडून बाचाबाची झाली, त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना रोखले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग १०० वर्षांतील सर्वात मोठ्या जागतिक महामारीच्या संकटाचा सामना करत आहे. या कोरोनाचा वापर पक्षीय राजकारणासाठीही झाला, तो मानवतेसाठी योग्य नाही. विरोधकांना टोला लगावत मोदी म्हणाले की, तुम्ही उलटी टोपी का घालता. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी सभागृहात गदारोळ सुरू केला..