मुंबई (वृत्तसंस्था) अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डातआज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले असून जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दुःख व्यक्त
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षास आग लागून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत. नगर जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना दुर्दैवी असून सदर घटनेच्या उच्चस्तरीय सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याचे निर्देश सर्व संबंधित विभागांना तात्काळ देण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. रुग्णालयातील अन्य रुग्णांच्या सुरक्षिततेची व आरोग्यसेवेची संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
आगीच्या चौकशीसाठी समिती स्थापन
अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील अति दक्षता विभागाला आज सकाळी साडेदहा वाजता शॉक सक्रीट मुळे आग लागली. या विभागात १७ कोवीड रूग्ण दाखल होते. यापैकी दहा रूग्णांच्या होरपळून मृत्यू झाला तर १ रूग्ण अत्यवस्थ आहे. इतर रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांनी दिली.
जिल्हाधिकारी भोसले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली आहे. भोसले म्हणाले, नाशिक येथे झालेल्या गॅस गळतीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात आले होते. मात्र तरीही दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबतची चौकशी करण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.