भुसावळ (प्रतिनिधी) शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे सुरू आहेत. सुरू असलेली नालेसफाई व्यवस्थित करण्यात यावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष अनिरुद्ध अनिल कुळकर्णी यांनी भुसावळ मुख्याधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहरात जी मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे सुरू आहेत. त्यात ती कामे नीट करणे आणि वाहतूक करते वेळीस जो नाल्यामधील गाळ आणि कचरा पूर्ण रस्त्यावर पडतो तो त्या ठेकेदाराकडून साफ करून घेणे. त्या कचऱ्यामुळे सामान्य नागरिकांना धूळ आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. सदर वाहतुकीची व्हिडिओ शूटिंग आम्ही आपणास देतो. तरी आपण ठेकेदारास समजवून सांगावे आणि मुख्य रस्त्याची स्वच्छता करून घ्यावी, संबंधित ठेकेदार गाळ वाहतुकीचे नियम पाळत नसेल तर त्याचे बिल अदा करू नये, आपण ठेकेदारास सांगून रोज रात्री रस्ता स्वच्छ करावयास लावावा, अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून येत्या काळात मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदन देताना सरचिटणीस युवा मोर्चा श्रेयस इंगळे, उपाध्यक्ष अथर्व पांडे, गोपिसिंग राजपूत, अनुप पुरोहित, मयूर अंजाळेकर, विजय डोंगरे, प्रशांत भट आणि युवा मोर्चा कार्यकर्ते उपस्थित होते.
















