मुंबई (वृत्तसंस्था) एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी हे सरकार काळे झेंडे दाखवण्याच्याच लायकीचं असल्याची टीका केलीय. तसेच एसटी कर्मचारी तुमचं दुकान बंद केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार काळे झेंडे दाखवण्याच्याच लायकीचं आहे. काळ्या पायाचं हे सरकार आहे. अनेक संकटाच्या काळात या सरकारने काहीही मदत केली नाही. सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत त्या ऐकून घ्याव्या. त्यांना काय देता येईल, काय देता येणार नाही याबाबतही चर्चा करावी. अन्यथा हेच एसटी कर्मचारी तुमचं दुकान बंद केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराच पडळकर यांनी ठाकरे सरकारला दिलाय.
परिवहन खात्याचे सचिव हे परदेशात जातातच कसे? गेल्या सात दिवसांपासून आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे आणि हे परिवहन सचिव परदेशात जातात. त्यांची चौकशी झाली पाहिजे. ते मंत्रालयात आले तर त्यांच्या तोंडाला आम्ही काळे फासणार, अशी आक्रमक भूमिका पडळकर यांनी घेतलीय. तसंच परिवहन विभागाचे MD शेखर चन्ने यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणार, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिलाय. त्या पार्श्वभूमीवर उद्या प्रवीण दरेकर हे शेखर चन्ने यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी असतील असं पडळकर यांनी सांगितलं.