पाळधी ता.धरणगाव (प्रतिनिधी) आपल्या संविधान सभेने अत्यंत मेहनतिने ४४ सभा घेऊन , ७५३५ सूचना अभ्यासुन २ वर्षे ११ महीने १८ दिवस एका दिवसात १८ – १८ तास लिखण करुन ३९५ कलमांची , ८ परिशिष्ट व २० भाग असलेलेली जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना तयार करुन देशात समता , स्वातंत्र्य, बंधुता , न्याय , स्त्री पुरुष समानता प्रस्थापित केल्याने, आम्ही आज ‘आमचे संविधान, आमचा स्वाभिमान’ असे सांगत आहोत. पण हेच घोष वाक्य चळवळ स्वरुपात पुढं आले तर सर्वसामान्य जनतेत संविधाना विषयी अधिक जागरूकता निर्माण होईल, असे विचार प्रसिद्ध साहित्यिक तथा वीचारवंत जयसिंग वाघ यानी व्यक्त केले.
पाळधी येथील इम्पेरिअल इंटरनेशनल स्कूलमध्ये २१ नोव्हेंबर रोजी आयोजित संविधान सप्ताहचे उदघाटन करतांना वाघ बोलत होते. या संविधान सप्ताह मध्ये निबंध , चित्र , भाषण अश्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. जयसिंग वाघ यांनी आपल्या अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणात पुढं सांगितले की भारतीय संविधान कुण्या देशातुन आयात केलेले नाही. कुण्या संविधानाची नक्कल केलेली नाही , कुण्या अन्य संविधानातुन काही तत्वे घेतली नाहीत. तर या भारतभूमित उदयास आलेली तत्वेच त्यात समाविष्ट केली आहेत.
आपल्या संविधानाला जगातील एक आदर्श संविधान असे गौरविले जाते. पण आपणच तिच्या विरुद्ध ओरडत असतो , काही वेळेस तिला जाळुन टाकतो तेंव्हा असे प्रकार देशात चालू राहिले तर देशात अराजकता माजेल असेही वाघ यांनी उदाहरण देऊन स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या परवीन खान होत्या त्यांनी संविधान व आपली कर्तव्ये याविषयी विचार व्यक्त केले. सुरुवातीला संविधानकार डॉ बाबासाहेब आम्बेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले , त्या नंतर वाघ यांचा प्राचार्या खान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा सतीष पाटील , परिचय प्रा मनीषा पाटिल यांनी तर आभार प्रा जी डी पाटील यांनी केले. या कार्यक्रमास प्राध्यापक , शिक्षक , कर्मचारी , विद्यार्थि मोठ्या संखेने हजर होते. संस्था प्रमुख इंजीनियर नरेंद्र चौधरी यांनी संविधान सप्ताहचे आयोजन करुन शैक्षणिक क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केल्याने वाघ यांनी त्यांचा गौरव केला.