कुन्नूर (वृत्तसंस्था) तामिळनाडूत झालेल्या भीषण दुर्घटनेत देशाचे चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपीन रावत यांचं निधन झालं आहे. भारतीय वायूदलाने ट्विट करत याबबात माहिती दिली आहे. जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिया रावत यांच्यासह विमानात असलेल्या आणखी 11 जणांचं दुर्देवी निधन झालं आहे. तर या दुर्घटनेत भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वरुण सिंह हे भारतीय हवाई दलात ग्रुप कॅप्टन म्हणून सेवेत असून हेलिकॉप्टर दुर्घटनेत ते गंभीररित्या जखमी आहेत. वेलिंग्टन येथील लष्कराच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वरुण सिंह हे भारतीय हवाईदलातील कर्तबगार अधिकारी म्हणून ओळखले जातात. तेजस हे लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त होण्यापासून त्यांनी वाचवलं होतं. १२ ऑक्टोबर २०२० रोजी ही घटना घडली होती. तेजस विमानाने उड्डाण घेतले आणि १० हजार फूट उंचीवर विमान पोहचताच फ्लाइट कंट्रोल सीस्टीम आणि लाइफ सपोर्ट सीस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाला. ही बाब लक्षात येताच प्रसंगावधान दाखवत वरुण सिंह यांनी दुर्घटना टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सर्वप्रथम त्यांनी १० हजार फुटांवरून कमी उंचावर विमान आणले. मात्र त्यानंतरही फ्लाइट कंट्रोल सीस्टीम काम करत नव्हती. तरीही आपले पूर्ण कसब पणाला लावत वरुण सिंह यांनी विमानाचे सेफ लँडिंग करण्यात यश मिळवले होते. मुख्य म्हणजे आजपर्यंत तेजस या लढाऊ विमानाचा एकदाही अपघात झालेला नाही. वरुण यांना या कामगिरीसाठी शौर्यचक्र जाहीर करण्यात आले होते. यावर्षी स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
















