म्हैसूर (वृत्तसंस्था) कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये एका २२ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. म्हैसूरजवळ दरोडेखोरांच्या टोळीला पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तिच्या प्रियकराला मारहाण करण्यात आली. दरम्यान, एमबीए करत असलेली ही तरुणी महाराष्ट्राची असल्याचं मीडिया रिपोर्ट्समधून सांगण्यात येतंय. या घटनेवरून कर्नाटकमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सामूहिक बलात्कारातील पीडित तरुणी ही महाराष्ट्राची असून ती म्हैसूरच्या एका खासगी कॉलेजमध्ये शिकते. तिच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आतापर्यंत एकाही आरोपीला अटक झालेली नाही. पीडित तरुणीला जबर मानसिक धक्का बसला आहे. यामुळे तिचा पोलिसांना जबाब अद्याप घेता आलेला नाही. पोलिस आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न करत आहे. अद्याप कुणालाही या प्रकरणी अटक झालेली नाही. अधिक माहिती मिळवली जात आहे, असं कर्नाटकचे गृहमंत्री ए. ज्ञानेंद्र यांनी सांगितलं.
पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल केला आहे. म्हैसूर शहराच्या बाहेर असलेल्या चामुंडी हिल्सजवळ काही जणांनी पीडित तरुणी आणि तिच्या प्रियकराला घेरलं. यानंतर त्यांच्याकडून पैसे मागितले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपींनी त्यांना मारहाण केली. यातील दोन आरोपींनी पीडित तरुणीवर बलात्कार केला. तिच्या प्रियकराला आरोपींनी बेदम मारहाण केली, असं तक्रारीत म्हटलं आहे. चामुंडी हिल्स हा भाग म्हैसूरपासून जवळपास १३ किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. इथे चामुंडेश्वरी मंदिर आहे.
गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल – मुख्यमंत्री बोम्मई
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला असून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तसंच घटनेवेळी तिच्या प्रियकरालाही बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही दुर्दैवी घटना आहे आणि सरकारने हे प्रकरण गंभीरतेने घेतलं आहे. गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असं मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले.