अमरावती (वृत्तसंस्था) आंध्रप्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वच्छतागृहात छुपा कॅमेरा लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी याच महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
एस. आर. गुडलावेरू अभियांत्रिकी महाविद्यालयातील ही घटना आहे. या महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहणाऱ्या शेकडो मुलींनी गुरुवारी रात्री आंदोलन सुरू केले. वसतिगृहाच्या स्वच्छतागृहात कॅमेरा लपवण्यात आल्याचे एका मुलीच्या निदर्शनास आले होते. हळूहळू सर्व मुलींना याबाबत समजल्यानंतर मोठा गदारोळ झाला. वसतिगृहातील सर्व मुली महाविद्यालयाच्या परिसरात जमल्या आणि त्यांनी आरोपीच्या अटकेसाठी आंदोलन पुकारले. विद्यापीठ प्रशासनाने याबाबत पोलिसांना कळवले. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत याच कॉलेजमधील एका विद्यार्थ्याला अटक केली.
विजय कुमार असे या विद्यार्थ्यांचे नाव असून तो अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला आहे. विजयकुमारचा लॅपटॉप, फोन तपासल्यानंतर त्यामध्ये छुप्या कॅमेऱ्याने रेकॉर्ड केलेले शेकडो व्हिडीओ आढळले. त्याने काही व्हिडीओ इतर विद्यार्थ्यांना विकल्याचे देखील समजते. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी अनेक विद्यार्थिनींच्या पालकांनी महाविद्यालयात धाव घेत प्रशासनाला जाब विचारला. कॉलेज प्रशासनाने विद्यार्थिनी आणि पालकांना तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच भविष्यात अशी घटना घडू नये, यासाठी अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना लागू करण्यात येतील, असेही कॉलेजकडून सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्याला या महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात प्रवेश मिळालाच का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.